Now Reading:
हिंदुजा कॉलेजच्या पदपथावर मोचीकाम करणारी ही महिला शिवतेय तिच्या मुलांचं भविष्य
हिंदुजा कॉलेजच्या पदपथावर मोचीकाम करणारी ही महिला शिवतेय तिच्या मुलांचं भविष्य

हिंदूजा कॉलेज, चर्नी रोडच्या पदपथावर बसणारी ५५ वर्षीय महिला मोची द्राैपदा अवगुणे. त्यांना आठवतही नाही की, त्या या व्यवसायात कधीपासून आहेत ते. लग्नानंतर तरूण वयातच त्या आपल्या पतिसाेबत माेचीकाम करायला लागल्या.

समाजाची ताेंडशिवणी

नवीन नवीन असताना लोक त्यांना पाहून हसत, शेरेबाजी करत. लोकांच्या अशा विक्षिप्त प्रतिक्रिया पाहून त्यांना संकोच वाटायचा, मनस्तापही व्हायचा. यातून सावरायला त्यांना बराच वेळ लागला. शेवटी पोटाचा प्रश्न सोडवायचा होता म्हणून सर्व मानापमान मोठ्या हिंमतीने गिळत त्या रोज कामाला हजर होत.

त्याकाळी बऱ्याच महिला घरकाम करत, द्राैपदाजीसुद्धा करू शकत होत्या. घरकामात आपला घरसंसार सांभाळून पैसे कमावता येतात. पण, तरीही त्यांनी पूर्ण दिवस उन्हातान्हात बसून मोची कामाची जबाबदारी स्वीकारली. जशी त्यांना मोची कामाचे कसब अवगत झाले तसे त्यांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस दुसरं दुकान टाकलं.ळ खाण्यासाठी अगदी दादर स्टेशन सारखी लोकांची गर्दी असते.

माणुसकीचा लळा  

तशा त्या मूळच्या मालाडमधील मालवणी भागात राहणाऱ्या. त्यांचा मुलगा मतिमंद अाहे तर मुलगी SNDT मध्ये शेवटच्या वर्षात शिकतेय. या नवरा-बायकोच्या दिवसभराच्या तीन-चारशे रुपयांच्या कमाईत घर चालवणे तसेच दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे जवळपास अशक्यच. पण, त्यांची ही आर्थिक कोंडी इथल्या दुकानदारांनी सोडवली आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणाच्या खर्चास हातभार लावला. गेल्या चार दशकात त्यांनी चर्नी रोडच्या या शांत भागास एका गजबजलेल्या मार्केटमध्ये रूपांतरित होताना पाहिलंय. या गजबजाटात आजही माणुसकी कायम आहे याचंच हे उदाहरण. म्हणूनच कितीही काहीही झालं तरी मात्र त्या हा भाग सोडण्यास तयार नाहीत. त्या सांगतात की, त्यांना इथल्या आवाराचा, माणसांचा लळा लागलाय.

प्रेरणास्थान

त्यांच्या या धाडसी निर्णयापासून सीता विटाळ (४५) या त्यांच्या भाचीनेसुद्धा प्रेरणा घेत वडिलांच्या निधनानंतर त्यांचा व्यवसाय आपल्या खांद्यावर घेतला. ही एकप्रकारे त्यांच्या निर्धाराची पावतीच म्हणावी लागेल. आपल्या मुलाबाळांना पोटभर खाऊ घालून त्यांचं शिक्षण भागवता येतंय यातच त्या समाधान मानतायत. त्यांना तर कल्पनाही नाही की, ‘जागतिक महिला दिन’ नावाची काही गोष्ट असते ते.

आम्ही या सामान्य स्त्रीच्या असामान्य निर्धाराला सलाम करतो.

Input your search keywords and press Enter.