Now Reading:
जाणून घ्या, लिफ्टमध्ये आरसा का असतो?
जाणून घ्या, लिफ्टमध्ये आरसा का असतो?

जगातील सर्वात महत्त्वाच्या शोधांची यादी केली तर त्यामध्ये लिफ्ट पहिल्या पाचमध्ये तर नक्कीच असेल. चौथ्या माळ्यावर जिने चढून जाईनपर्यंत लोकांची छाती भरुन यायची. लिफ्टचा शोध लागल्यावर बऱ्याच लोकांचे कष्ट कमी झाले. सामानाची ने-आण सोपी झाली. पण जसजशी लिफ्ट रोजच्या वापरात रुळत गेली तशी एक नवीनच तक्रार येऊ लागली. लोकांना वाटायचे की लिफ्टचा वेग फार कमी आहे.

कंपन्यांनी केले निरनिराळे उपाय

लिफ्ट बनवणाऱ्यांना या समस्येचे काय करावे काही समजेना. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या डिझाइन तयार केल्या. प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या दिशेने ही समस्या सोडवत होती. काहींनी मोठ्या मोटर बसवण्याचा प्रस्ताव मांडला. तर काहींनी आधुनिक कप्पी तयार केल्या. पण काही केल्या समस्येचे निवारण होत नव्हते.

समस्येला दिले निराळे वळण

फक्त एका इंजिनीअरने वेगळी शक्कल लढवली. त्यांनी समस्येच्या निराळ्याच पैलूवर लक्ष केंद्रीत केले. हळूवारपणे जाणाऱ्या लिफ्टपेक्षा त्यामधील प्रवाशांच्या मानसिकतेचा त्यांनी विचार केला. ‘त्यांना असे का वाटते की लिफ्ट हळू हळू खाली जातेय?’ याचा त्यांनी सखोल अभ्यास केला.

लिफ्ट खरंच हळू चालतेय का? त्यांना उंचीची भीती वाटते का? प्रवाशांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी काय करता येईल? त्यांचे लक्ष दुसरीकडे केंद्रीत करायला हवे का? यासारखे अनेक प्रश्न त्यांनी स्वतःला विचारले. शेवटी एक गोष्ट त्यांच्या हाती लागली. 

लोकांची मानसिकता

लोक लिफ्टमध्ये असताना त्यांना करण्यासाठी काही नसते. यामुळे त्यांचे सर्व लक्ष लिफ्टकडेच असते असे त्यांना आढळून आले. तसेच प्रवाशांना उंचीवरुन पडण्याची भीती वाटते. प्रवाशांचे लक्ष दुसरीकडे वळवल्यास वेळ कधी जाईल हे त्यांच्या लक्षातही येणार नाही हे त्यांनी हेरले. आता समस्या तर कळली. यावर इलाज काय हा नवीन प्रश्न निर्माण झाला.

स्वस्तात मस्त जुगाड

विविध प्रकारच्या संकल्पनांमधून शेवटी लिफ्टमध्ये आरसे बसवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. असे केल्याने खाली पडण्याच्या भीतीचा विचार मनात येण्याऐवजी आपले केस सरळ आहेत का, कपडे ठीक आहेत ना यासारख्या बारीकसारीक गोष्टींवर प्रवाशांचे लक्ष जाऊ लागले. या इतक्या साध्या संकल्पनेने डिझाइनमध्ये काही बदल न करता लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्यांचा प्रश्न सुटला.

यातून विचार करण्यासारखी गोष्ट ही की, समस्या तर साधीच होती. पण त्यावर उपाय म्हणून किती महागड्या आणि अवाढव्य संकल्पना शोधण्यात आल्या. शेवटी सूक्ष्म निरीक्षणातून काढलेल्या या उपायाने कंपनीचे पैसेच वाचवले नाही तर आपला लिफ्टमधील प्रवासही सुखकर केला. जीवनातील समस्यांशी तोंड देतानाही अशाच प्रकारे कल्पकबुद्धीने विचार केल्यास सगळे काही सोपे होईल.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.