Now Reading:
अभिनेता इरफान खानला ग्रासलंय दुर्मिळ ट्युमरने; जाणून घ्या या आजाराबद्दल
अभिनेता इरफान खानला ग्रासलंय दुर्मिळ ट्युमरने; जाणून घ्या या आजाराबद्दल

गेल्या आठवड्यात ट्विटरमार्फत अभिनेता इरफान खानने त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचे जाहीर केले. साहजिक सारा देश हळहळला पण लगेचच पुढचा प्रश्न उभा राहीला की, न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर म्हणजे काय?

एंडोक्राइन यंत्रणा

तसं ‘न्यूरो’ हा शब्द ऐकला की आपण लगेचच त्या आजाराला मेंदूशी जोडतो. पण इथे तसं नाहीये. या आजाराचे बरेच प्रकार असून, तो शरिरातील वेगवेगळ्या भागातून मूळ धरू शकतो. शरिरातील एंडोक्राइन यंत्रणा ही हार्मोन्सची निर्मिती करणाऱ्या पेशींपासून बनलेली असते. हार्मोन्स हे एक रासायनिक तत्व आहे जे आपल्या रक्तामार्फत शरिरातील विविध अवयवांपर्यंत वाहून नेले जातात.

न्यूरोएंडोक्राइन ट्युमर (NET) म्हणजे काय?

शरिराच्या एंडोक्राइन यंत्रणेतील पेशी शरिरातील हवा व रक्तप्रवाहाचं नियमन करतात. न्यूरोएंडोक्राइन ट्युमर याच पेशींपासून सुरु होतो व शरिरातील इतर अवयवांमध्ये पसरतो.

न्यूरोएंडोक्राइन ट्युमर (NET) ची कारणे व लक्षणे

प्रत्यक्षात हा ट्युमर कशामुळे होतो याचं नेमकं निदान तज्ज्ञांनाही सांगता आलेलं नाही. पण तुमच्या कुटुंबात याआधी कोणाला न्यूरोएंडोक्राइन ट्युमर (NET) झाला असल्यास तुम्हाला याचा धोका असू शकतो.

सुरुवातीला NET ची लक्षणे आढळून येत नाहीत. दिसली तरी ती सर्वसामान्य आजारांसारखीच असतात. शरिरात गाठी होणे, पोट बिघडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उच्च रक्तदाब, सतत ताप येणे, रात्रीचा घाम येणे, अचानक वजनात वाढ किंवा घट, अल्सर, खोकला, कावीळ, ग्लुकोज पातळीत बदल इ. या ट्युमरची लक्षणे आहेत. ट्युमरच्या जागेवरही या आजाराची लक्षणे अवलंबून असतात.

डायग्नॉसिस व उपचार

NET चा उपचार करणे त्याच्या अनियमित लक्षणांमुळे कठीण जाते. पण वेळेत निदान केल्यास शस्त्रक्रियेने यावर उपचार करता येऊ शकतो. पण शेवटच्या टप्प्यात यावर उपचार करणे जवळपास अशक्य आहे पण आजाराची लक्षणे काही वर्षांसाठी नियंत्रणात ठेवता येऊ शकतात. उपचारामध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन यांचा समावेश आहे.

वाचण्याची शक्यता

हा एक दुर्मिळ आजार असून, यातून वाचण्याची शक्यता इजा झालेल्या अवयवावर तसेच ट्युमरच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने यावर मात करणे शक्य आहे. आम्ही आशा करतो की इरफान यातून सुखरुप बरा होऊन चित्रपटसृष्टीत पुन्हा आपला दरारा दाखवण्यास सज्ज होईल.

Input your search keywords and press Enter.