Now Reading:
६ प्रकारचे शाकाहारी मित्र जे प्रत्येक ग्रुपमध्ये पाहायला मिळतात
६ प्रकारचे शाकाहारी मित्र जे प्रत्येक ग्रुपमध्ये पाहायला मिळतात

कुठेही खायला जायचा प्लॅन बनला की, ग्रुपमधील हे शाकाहारी जीव सुळसुळत बाहेर येतात. मग त्यांच्या सतराशे अठ्ठावन्न अटी पार पाडल्या तर कुठे आपला प्लॅन पुढे सरकतो. या शाकाहारींचेही विविध प्रकार असतात. यातला एक ना एक तरी जण प्रत्येक ग्रुपचा भाग असतो. तर बघा तुमचा मित्र यातल्या कोणत्या गटात मोडतो.

१. शुद्ध शाकाहारी

हे म्हणजे अगदी चिकनच्या नावानेही चार कोस लांब जाऊन उभे राहणारे. यांचं दैवत म्हणजे पनीर आणि तंदुरीचा स्टॉल यांच्यासाठी झपाटलेल्या बंगल्याप्रमाणे असतो.

२. ग्रेव्हीटेरियन

ही प्रजाती चिकन-मासे तर खात नाही पण यांना ग्रेव्ही हवी. ‘मला फोडी नको मी शाकाहारी आहे ना. पण थोडा रस्सा वाढाल का?’

हा शाकाहाराचा मापदंड कुठून मिळवतात कोणास ठाऊक.

३. आग्रही शाकाहारी

यांना खरंतर चिकन खायचं असतं पण हे कोणी दुसरा आग्रह करतोय का याची वाट पाहत असतात. म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळ्या झाडणे.

‘नको नको. मी शाकाहारी आहे! पण आता तुम्ही आग्रह करताय तर द्याच थोडं’

४. कॅलेंडरप्रमाणे बदलणारे शाकाहारी

हे कॅलेंडरच्या दिवसावर आपले रंग बदलतात. मंगळवार, गुरुवार, शनिवार सोडला तर चिकन वर आडवा हात मारणारे. संकष्टी-एकादशीला शाकाहार करणारे.

५. अंडाहारी (एगीटेरियन)

हे प्रकरण तर सर्रास आढळतं. चिकन नाही पण अंड्याची भुर्जी चालेल. आता तर जगजाहीर झालंय की अंडे शाकाहारी आहे. कदाचित या संशोधनामागेपण कोणीतरी ‘एगीटेरियनच’ असेल. ज्याचे मित्र त्याच्या अंडे खाण्याच्या सवयीवरून टोमणे मारत असतील.

६. घराबाहेरचे मांसाहारी

हे आणखी एक निराळं पात्र असतं. आईसमोर पनीर आणि घराबाहेर चिकनवर सपासप ताव मारणारे हे महारथी. यांचं कसं होणार पुढे काय माहित.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.