Now Reading:
सावधान! या झाडाच्या जवळ जाणाऱ्यांना ते थेट यमलोकात पाठवते
सावधान! या झाडाच्या जवळ जाणाऱ्यांना ते थेट यमलोकात पाठवते

वनस्पतींच्या बिया किटक किंवा पक्षांद्वारे इतरत्र पसरतात आणि अशाचप्रकारे अनेकदा नवीन झाडे उगवतात हे आपण पुस्तकांमध्ये शिकलोय. एखाद्या झाडाच्या बिया पक्षी त्यांच्या चोचीमार्फत पसरवतात. परंतु, एखाद्या झाडाच्या बियांमुळे पक्षांचे प्राण गेल्याचे तुम्ही कधी ऐकलेय का? धक्का बसला ना! पण असे खरंच घडतेय. हिंदी आणि पॅसिफिक महासागराच्या उष्ण कटीबंधीय प्रदेशामध्ये वनस्पतींची एक अशी प्रजाती आढळते जी त्यावर येऊन बसणाऱ्या पक्षांना जखडून त्यांना जीवे मारते.

हे झाड असे का करते याबाबत वनस्पती शास्त्रज्ञांकडे ठाम उत्तर नाही. काहींच्या मते ही उत्क्रांतीच्या न उलगडणाऱ्या कोड्यांपैकी एक उकल आहे.

बियांभोवती दडलेय मायाजाळ

‘पिसोनिआ ट्री’ असे या वनस्पतीचे नाव आहे. यामध्ये लांब बिया असतात. बियांभोवती चिकट द्रव्य आणि लहान हूक असतात. हे हूक त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीस चिकटतात. यामध्ये किटक आणि समुद्री पक्षांचाही समावेश होतो. हे द्रव्य इतक्या जलद गतीने तयार होते की एकदा अडकलेल्या पक्षास त्याच्या तावडीतून सुटका करुन घेणे अशक्य होते. अशा अडकलेल्या पक्षांचे इतर पक्षांनी भक्षण न केल्यास ते तसेच झाडावर कुजत पडलेले पाहायला मिळतात. ही काही दुर्मिळ घटना नाही. पिसोनियाच्या बाबतीत हे इतके सर्वसामान्य आहे की त्यास ‘दी बर्ड कॅचर ट्री’ म्हणजेच पक्षी पकडणारे झाड असे संबोधले जाते.

१० महिने चाललेला अभ्यास  

कॅनडामधील व्हिक्टोरिआ विद्यापिठातील अॅलन बर्जर यांना ९० च्या दशकात या वनस्पतीबद्दल समजले. त्वरित त्यांनी कझीन आयलंड गाठले. त्यांनी पिसोनिया आणि तेथील समुद्री पक्षांच्या जीवनावर १९९९ ते २००० दरम्यान १० महिने अभ्यास केला. त्यांना या गोष्टीच्या मुळाशी जायचे होते. पिसोनियामध्ये दडलेले गूढ त्यांना सतत सतावत होते.

पक्षांच्या शवावर प्रयोग

त्यांनी या झाडामुळे दगावलेल्या पक्षांच्या शवावर प्रयोग केले. त्या पक्षांच्या सांगाड्यातून वनस्पतीच्या वाढीमध्ये काही फरक पडत नाही, असे त्यांना आढळून आले. तसेच झाडांना पक्षांच्या विष्ठेतून अधिक खत मिळते. मग हे पक्षी जीवंतपणी पिसोनियाच्या अधिक फायद्याचे होते.

बियांच्या स्थलांतरणामुळे उलगडले गुपित

त्यानंतर त्यांनी या बिया पक्षांच्या अंगावर शिंपडल्या. बियांचे स्थलांतर करता येते का हे त्यांना पाहायचे होते. पण बिया पाच दिवसातच मरण पावल्या. मग हे ही कारण रद्द झाले. पण समुद्राच्या पाण्यात काही वेळा बुडवल्याने बिया रुजत. यावरुन त्यांनी हा निकष लावला की, पिसोनिया इतर वनस्पतींप्रमाणेच जीवंत पक्षांमार्फत बियांचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करते. परंतु यामध्ये काही पक्षांचा अपघाती मृत्यू होतो.

बियांच्या स्थलांतरणासाठी पक्षांचे जीवंत राहणे आवश्यक आहे. पण बियांच्या चिकटपणामुळे कधी कधी हे पक्षी त्यामध्येच गुरफटतात आणि मरण पावतात.

हा अहवाल २००५ मध्ये जाहीर झाला आहे. मग आज याची चर्चा का होतेय? तर सांगण्याचा मुद्दा हा की, निसर्गाने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीमागे त्यानुरुप कारण दडलेले असते. त्याचा आदर करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

Cover Image Source: YouTube

Input your search keywords and press Enter.