Now Reading:
यशस्वी होण्यासाठी त्याग करा या १० गोष्टींचा, असं सांगतायत ही जगप्रसिद्ध माणसे
यशस्वी होण्यासाठी त्याग करा या १० गोष्टींचा, असं सांगतायत ही जगप्रसिद्ध माणसे

यशाचा मार्ग समर्पणाच्या अंगणातून जातो. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही ठरलेले नियम आहेत. त्यातील एक म्हणजे तुमच्या विकासात अडथळे आणणाऱ्या गोष्टींचा त्याग. तुम्ही जर यशस्वी लोकांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतलात तर तुम्हाला त्यांच्या यशाचे गुपित त्यांनी मागे सोडलेल्या सवयींमध्ये आढळून येईल. या सवयी कोणत्या हे जाणून घ्या पुढे-

१. संकोच

मी श्रीमंत होणार यावर मला नेहमीच विश्वास होता. याबाबतीत मला कोणताही संकोच होता असे मला वाटत नाही.-वॉरेन बफेट

जेव्हा तुम्ही मस्करीतही काहीतरी नकारात्मक विचार करता तेव्हा कुठे ना कुठे तुमच्या प्रगतीमध्ये तुम्ही स्वतःच अडथळा निर्माण करत असता. तुम्ही स्वतःच्या मेंदूला सकारात्मक विचारांचं वळण देता तिथपासूनच तुमच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात होते.

२. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय 

वर्षांचा अनुभव चुलीत घालत भावनाविवश होऊन घेतलेले निर्णय लॉटरीसारखे असतात, लागली तर लागली. तुम्हाला आठवतंय कधी अशीच सहजासहजी लॉटरी लागल्याचे. म्हणून कधीही निर्णय घेताना व्यवस्थित आकलन करूनच घ्यावा. मनस्ताप होत असताना रागाच्या भरात निर्णय घेण्यापेक्षा प्रथम तुमचा राग निवळू द्या. म्हणजे तुम्हाला एखाद्या मुद्द्याचे फायदे तोटे सुस्पष्टपणे पाहण्यास मदत होईल.

३. स्वतःची प्रशंसा करा

आत्मविश्वास आतूनच यायला हवा, इतरांचं कौतुक, प्रशंसा नक्कीच मदत करते पण आत्मविश्वास स्वतःचा स्वतः निर्माण करावा लागतो. – स्टीव्ह जॉब्स

तुमच्या निर्णयांचा, कल्पनांचा पाठपुरावा इतरांनी करण्याआधी तुम्ही स्वतः करायला हवा. तुमच्या स्वप्नांवर तुम्ही स्वतः विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक छोट्या मोठ्या क्षणी स्वतःचे कौतुक करायला विसरु नका. संधी मिळत नसते ती निर्माण करावी लागते.

४. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवणे

आयुष्यातील प्रत्येक पैलू आपल्या नियंत्रणात ठेवण्याच्या नादात आपण आपला बहुमूल्य वेळ निरर्थक गोष्टींच्या मागे घालवतो आणि आपलं नेमकं काम बाजूलाच राहतं. काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात हे स्वीकारणे कधी कधी फायद्याचे असते. याचा अर्थ हा नाही की तुम्ही निष्काळजीपणे वागाल.

५. लोक काय म्हणतील

जग म्हणजे एक भव्य चढाओढ आहे. प्रत्येकाला पुढे जायचंय, प्रत्येकाला प्रकाशझोतात यायचंय. या सगळ्यातून तुम्हाला तुमचा मार्ग काढायचाय. तुमच्याशी जुळणारी व्यक्ती तुमच्या प्रगतीसाठीच तिथे असेल याची शाश्वती नाही. म्हणून तुमच्या प्रवासाबद्दल इतरांना काय वाटतंय हा विचार मनात घोळवण्यापेक्षा आपलं काम करत राहा कधी ना कधी तुम्ही इच्छित स्थळी नक्की पोहोचाल. इतरांकडून प्रशंसा मिळवण्याच्या आसक्तीने काम करू नका.

६. दोष देणे

मच्याकडून चूक झाल्यास त्यावर शोक करत बसू नका, त्यामधून धडा घेऊन कामाला लागा – बिल गेट्स

एखादी चूक घडली किंवा अपयश हाती लागलं तर एकमेकांना दोष देत बसू नका. तुमचा हाच वेळ त्या घटनेचं आकलन करण्यात घालवा, जेणेकरुन तुमचं अपयशसुद्धा तुमच्या यशाचा पाया रचेल.

७. एका वेळी अनेक काम करणे

एका वेळेस अनेक कामं हाताळण्यात काही अर्थ नाही. कामांची रितसर आखणी करून एकामागोमाग एक अशी कामे केल्याने कामाची गुणवत्ता सुधारते. तसेच एकाच ठिकाणी लक्ष केंद्रीत केल्याने विचारांमधील एकसंधता कायम राहते.

८. वाईट संगत

अशा माणसांची सोबत बाळगा जे तुमच्या उत्कर्षास हातभार लावतील- ओप्राह विन्फ्री

तुम्ही लहान असताना तुमच्या आई बाबांनी हे हजारदा सांगितलं असेल की, चांगल्या मुलांबरोबर राहत जा. हा सल्ला उभं आयुष्य लक्षात ठेवा. कारण जेव्हा तुम्ही आपल्यापेक्षा वरचढ व्यक्तींची सोबत ठेवता तेव्हा नकळत तुमच्या महत्त्वकांक्षेला चालना मिळत असते. म्हणून सकारात्मक विचार करणाऱ्यांसोबत राहणे कधीही उत्तम.

९. हार मानणे

यशस्वी लोक नकारावर थांबत नाहीत. ते त्या नकाराला होकारात बदलण्यासाठी झटतात. ते प्रत्येक वेळेस त्याच समस्येला वेगळ्या प्रकारे तोंड देण्याचा प्रयत्न करतात आणि यश खेचून आणतात.

१०. अवाजवी खर्च

संशोधनात असे आढळून आलंय की, बहुतेक श्रीमंत आणि यशस्वी लोक अवाजवी खर्च करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक खर्च ही एक गुंतवणूक असायला हवी. ते ऐशोआरामापेक्षा मुलभूत गरजांना प्रथम प्राधान्य देतात.

Input your search keywords and press Enter.