Now Reading:
केवळ एका विद्यार्थ्याला शिकवण्याकरिता सापांचा सामना करणारा शिक्षक!
केवळ एका विद्यार्थ्याला शिकवण्याकरिता सापांचा सामना करणारा शिक्षक!

प्रत्येक मुलाच्या जडणघडणीत आईवडिल यांच्या इतकंच शिक्षकांना महत्त्व असतं. एक काळ होता जेव्हा शिक्षक मुलांना अगदी पोटच्या पोरासारखी वागणूक देत असत. परीक्षेच्या काळात मुलांची विशेष शिकवणी घेत, ती ही विनामुल्य. आजच्या काळात गुरु-शिष्याचं असं नातं पाहायला मिळणे म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाही. पण अशीच एक कहाणी आजच्या काळातही श्वास घेतेय पुण्याजवळील एका गावात.

एकुलता एक विद्यार्थी

रंजिनीकांत मेंढे या २९ वर्षीय शिक्षकाची ही कहाणी. पुण्यापासून १०० किमी अंतरावर चंदर हे गाव आहे. गावात जेमतेम १५ झोपड्या असून, गावची लोकसंख्या कदाचित येथील सापांच्या लोकसंख्येहूनही कमी असावी. अशा या टुमदार गावात युवराज सांगळे हा ८ वर्षांचा मुलगा राहतो. या गावातील शाळेच्या एकुलत्या एक विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी रंजिनीकांत हे बाइकवर जवळपास ५० किमीचं अंतर कापत गाव गाठतात.

शाळेची दुर्दशा 

चंदर गावातील शाळा १९८५ मध्ये स्थापन झाली. सुरुवातीला तर शाळा म्हणजे फक्त ४ भिंती होत्या. ४ वर्षांपूर्वी छताच्या नावाने एक अॅसबेस्टॉसची शीट आली. गेली ८ वर्षे मेंढे या शाळेत शिक्षक आहेत. त्यात त्यांना बरेच भयावह अनुभव आलेत. एकदा तर छतावरूनच एक साप त्यांच्या अंगावर येऊन पडला. ही एकच गोष्ट नाही, चंदर गावी वीजेची सुविधासुद्धा उपलब्ध नाही. गावकऱ्यांनी दोन वर्षांपुर्वी १२ व्होल्ट्सचा पॅनेल मेंढे यांना पुरवला. या पॅनेलला टीव्ही जोडून ते थोडाफार डाउनलोड केलेला व्हिडीओ दाखवून युवराजला शिकवत असत. त्याची अभ्यासात गोडी टिकून राहण्यासाठी त्यांनी दोन टॅब विकत घेतलेत.

शिक्षणाबाबत अनास्था

साहजिक आहे, मित्र नसलेल्या शाळेत शिकायला कोणाला आवडेल? हे चित्र नेहमीच असं नव्हतं. आठ वर्षापूर्वी शाळेत ११ विद्यार्थी होते. पण पुढील शिक्षणाच्या सुविधा १२ किमी दूर असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. तसेच बहुतेक मुलींना पालक गुजरातला शेतामध्ये किंवा फॅक्टरीमध्ये मजुरीसाठी धाडत. त्यांना शाळेमध्ये घेऊन येण्यासाठी मेंढे यांनी फार विनवण्या केल्या पण, काही फरक पडेना शेवटी त्यांनी तो नाद सोडला. आता जेव्हा ते शिकवायला जातात तेव्हा युवराज झाडाझुडूपांत जाऊन दडतो. त्याच्या मनाची द्विधा मेंढे समजतात. कारण इतर मुलं खेळत असतात पण त्याला मात्र मेंढे आणि रिकामी वर्गाशिवाय काहीच नाही.

शाळेपर्यंत पोहोचण्याचं अग्निदिव्य

चंदर गावापर्यंत पोहोचण्यासाठी मेंढे यांना १२ किमी मातीचा रस्ता पार करून जावं लागतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूस ४०० फूट खोल दरी. हे इतकं अग्निदिव्य पुरेसं नव्हतं तर वाटेत सापांचा धुमाकूळ आहेच. एकदा तर चिखलातून वाट काढताना त्यांनी सापावरच गाडी चढवली होती.

फक्त एका विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी प्राणपणाने झटणाऱ्या गुरुवर्यास नेटवर मराठीचा मानाचा मुजरा!

Image and News Source: Times Of India

Input your search keywords and press Enter.