Now Reading:
कोल्हापूरातील या महिलेने ११ वर्षांत अडीचशे मुलांना दिलं मोफत शिक्षण!
कोल्हापूरातील या महिलेने ११ वर्षांत अडीचशे मुलांना दिलं मोफत शिक्षण!

कोल्हापूरमधील लत या गावातील लक्ष्मीनगर वस्तीमध्ये राहणाऱ्या सुशीला कोळी या शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या विलक्षण कामगिरीमुळे देशभरातील महिलांसाठी उमेदीचा मानबिंदू म्हणून उदयास आल्यात. वस्तीमध्ये एकही अंगणवाडी नसल्याचे शिक्षणाच्या महत्त्वाची जाण असलेल्या Sushila Koli यांच्या लक्षात आले. ही मुलं शिकलीच नाही तर पुढे त्यांचं कसं होणार? या अस्वस्थतेने त्यांना ग्रासले. अखेर त्यांनी ही परिस्थिती बदलण्याचा मनाशी निर्धार केला.

घरची शाळा

सुशीला यांनी यावर बराच विचार केला, मोठ्यांचं मार्गदर्शन मिळवलं. फुकटचे सल्ले द्यायला जो तो पुढे होता पण, नेमकं काम करण्यासाठी कोणीच पुढे होईना. सरकारी यंत्रणाही उदासिनच होती. म्हणून त्यांनी आपल्या घरापासूनच सुरुवात केली व घरच्या घरीच मुलांना मोफत शिक्षण दिलं. ही घरची शाळा दोन वर्षं चालली त्यानंतर ही शैक्षणिक वारी त्यांनी गावातील मंदिरामध्ये वळवली.

निर्धार 

पालक मुलांना शेतात घेऊन जात त्यामुळे सुरुवातीस अंगणवाडीकडे क्वचितच कोणी फिरकत असे. तरीही खचून न जाता त्या रोज दारोदारी वणवण करत मुलांना शाळेत पाठवण्यासाठी गावकऱ्यांना प्रवृत्त करत.

“एखादा चांगला विचार काही काळच वेशीबाहेर ठेवता येतो, कालांतराने तो शिरकाव करतोच!”

इथेही तसंच काहीसं झालं. हळूहळू गावातल्या मुलांचा किलबिलाट अंगणवाडी डोक्यावर घेऊ लागली. सुशीलाजींनी १९९१ मध्ये सुरू केलेली अंगणवाडी २००२ पर्यंत चालली. या जवळपास एक तपाच्या कालावधीत त्यांनी २५० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले.

त्यांच्या शाळेत शिकणारे सर्वच विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील होते म्हणून जाणिवपूर्वक त्यांनी कधीच फी आकारली नाही. त्यांनी चालू केलेली अंगणवाडी २००३-२००४ मध्ये सरकारी शाळेत रुपांतरीत करण्यात आली.

 Cover Image Source: Better India

Input your search keywords and press Enter.