Now Reading:
प्रत्येक संकटाला तोंडघशी पाडून स्वतःला घडविणारी, पद्मश्री कल्पना सरोज
प्रत्येक संकटाला तोंडघशी पाडून स्वतःला घडविणारी, पद्मश्री कल्पना सरोज

कल्पना सरोज, देशातील औद्योगिक क्षेत्रात खणखणून गाजलेलं व्यक्तिमत्व. कल्पनाजींचा जन्म अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गावातील एका मागासवर्गीय हवालदाराच्या कुटुंबातला. वयाच्या १२व्या वर्षी लग्न, सासरच्या जाचाला कंटाळून वडिलांसोबत परतलेली माहेरवाशीण आणि त्यामागोमाग गावकऱ्यांच्या टोमण्यांनी त्रस्त होऊन समाजासमोर हार मानून आत्महत्येचा प्रयत्न करणारी ही वीरांगना, आज ५०० कोटींच्या कंपनीची मालकिण आहे यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही.

सातवीत शाळा सोडावी लागली. पण त्यांची स्वावलंबनाची ओढ त्यांना १५ वर्षांच्या कोवळ्या वयात मुंबईत घेऊन आली. मुंबईमध्ये आल्यावर त्या कपड्यांच्या दुकानात कामाला लागल्या. मग स्वतःचं बुटीक सुरु केलं. तिथे विरंगुळ्यासाठी त्या रेडिओ ऐकायच्या. त्यातून त्यांना सरकारी कर्ज योजनांची बरीच माहिती मिळायची. त्यांनी ५०००० कर्ज काढून NGO स्थापन केले जे आता ‘कल्पना सरोज फाऊंडेशन’ म्हणून ओळखली जाते.

त्यासोबत त्यांनी रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरु केला. आणि एका पारंपरिक व्यवस्थेला धक्का बसतोय की काय असं वादळ समाजात उभं राहिलं. कल्पनाजींच्या भ्याड प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या नावाची सुपारी काढली. पण अगदी जीवावर ओढवलं तरीही त्यांनी आपला निर्धार सोडला नाही. आणि कमानी ट्यूब्सला नुकसानाच्या भोवऱ्यातून काढून एक इंडस्ट्री लीडर म्हणून नावारूपास आणलं. आजच्या तारखेला कल्पनाजी तब्बल ५०० कोटींहून अधिक संपत्तीच्या मालक आहेत. 

त्यांच्या या कामाची भारत सरकारनेही नोंद घेतली व २०१३ साली त्यांना पद्मश्री बहाल केला. या लाखमोलाच्या आयुष्याला करोडोंच्या घरात नेत अजूनही त्या कीर्तीची नवशिखरे गाठत आहेत.

Input your search keywords and press Enter.