Now Reading:
नोकरी सोडायची योग्य वेळ कोणती? या गोष्टींमध्ये दडलेत त्याचे सिग्नल्स!
नोकरी सोडायची योग्य वेळ कोणती? या गोष्टींमध्ये दडलेत त्याचे सिग्नल्स!

आपल्याकडे कोणतंही शुभकार्य शुभमुहुर्तावर करण्याची पद्धत आहे. पाडव्याला गाडी घ्यायची, दिवाळीला फ्रिज असं आपलं आपल्या गरजांनुसार आपण पंचांग आखलेलं असतं. पण मग आपल्या करिअरचं काय? करिअरमध्ये एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत उडी कधी मारायची? चिंता नाही! त्यासाठी तुम्हाला काही पंचांग किंवा ज्योतिषाची गरज नाही तर फक्त या ७ गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

१. तुमच्या कामात उत्साहाची कमी

जेव्हा कामात आनंद मिळतो तितकंच आपलं काम सुधारतं. म्हणून जेव्हा काम करताना उत्साह उरत नाही तेव्हा कामात लक्ष लागणं कमी होतं. काम करताना मनात सकारात्मक भावना उरत नाही. जर तुम्हाला दुसरी एखादी संधी खुणावत असेल तर आता वेळ आलीय नोकरी सोडण्याची.

२. आरोग्यावर परिणाम

जर तुमचं काम तुमच्या जीवावर बेतायला लागलंय तर त्या ठिकाणी थांबण्यात काही अर्थ नाही. आरोग्याची हेळसांड करून पैशाचा डोंगर उभा करण्यात कोणतंही शहाणपण नाही. कारण हाच पैसा पुन्हा तुमच्या ढासळलेल्या आरोग्यास सुधारण्यावर खर्च होणार. त्यासाठी एकतर तुमची कामाची पद्धत बदला किंवा नवीन नोकरी शोधा जिथे तुम्हाला कामात रामही मिळेल व त्यासमान आरामही मिळेल.

३. ऑफिसमधील दुषित वातावरण

बऱ्याचदा कामापेक्षा ऑफिसमधील वातावरण आपल्या मनस्तापाचे कारण बनते. नकारात्मक वृत्तीचे सहकर्मचारी, ऑफिसमध्ये चालणारं टुकार राजकारण अशा सर्व गोष्टी कामाला युद्धाचं स्वरूप देतात. कोणी सांंगितलाय एवढा सारा खटाटोप?

४. मन मारून ऑफिसला जाणे

सकाळी सकाळी उठून ऑफिसला जाणं रटाळ वाटायला लागलंय? तसं त्यात काय नवीन नाही. काम काम असतं आणि बहुतेकदा ते रटाळवाणंच असतं. पण अगदीच वीट आला असेल तर वेळ आलीय की तुमच्या करिअरला नवी दिशा देण्याची. अविचारी निर्णय न घेता, प्रथम दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधायला सुरुवात करा आणि दुसरी नोकरी मिळाल्यावरच ही नोकरी सोडा.

५. कंपनी डबघाईला येणे

आपण जेथे काम करतोय त्या कंपनीच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. तुमची कंपनी प्रगती करत असेल तर तुम्हाला वेळेवर पगार मिळेल. एकदा का कंपनीला उतरती कळा लागली की, अवेळी पगार, कामगार संख्येत घट करणे यासारखे घोटाळे व्हायला सुरुवात होते. अशा बुडत्या होडीचे बळी पडण्यापेक्षा वेळीच इतर संधींच्या शोधात बाहेर पडावे.

६. मनाचे ऐका

कधीकधी वरीलपैकी सर्व काही नीट चालत असतं. बॉस चांगला असतो, पगार, वातावरण, काम सर्व सर्व रितसर असतं तरीही काहीतरी चुकत असतं. त्यावेळेस मनाचा थांग घेणे गरजेचे असते. मनाला काय हवंय ते विचारावे आणि त्या दिशेने चालू पडावे.

७. आव्हानाची उणीव

जोवर तुमच्या महत्त्वकांक्षेला चालना मिळतेय तोवर तुमची वाढ होतेय, एकदा काय तुमची वैचारिक वाढ खुंटली की कामात तोचतोचपणा येतो. तुम्ही स्वतःला नवीन आव्हानांत गुंतवा. तरीही जर तुम्हाला समाधान मिळत नसेल तर तुम्ही नव्या कामाच्या शोधार्थ जाण्यास मोकळे आहात.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.