Now Reading:
कठीण प्रसंगातून बाहेर पडताना अशाप्रकारे मिळवा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर ताबा
कठीण प्रसंगातून बाहेर पडताना अशाप्रकारे मिळवा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर ताबा

आयुष्यात सतत चढउतार येत असतात. आनंदाच्या क्षणी तर सर्व काही आलबेल असतं. पण गाडी थोडी जरी रुळावरुन घसरली की बऱ्याचदा अंगावर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे वाटते. अशा वेळेस आपणच आपले शत्रू होऊन बसतो. परिणामी मनस्ताप, चिडचिड, वरवरचं आजारपण असं बरंच काही चालूच असतं. पण मग या परिस्थितीत नेमके कोणाचे पाय धरायचे? अहं! कोणाचेही पाय वगैरे धरायची काही गरज नाही. तुमचे तुम्ही समर्थ आहात. कसे? असे-

१. मदत घेणे

तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगातून जाताय याचा अर्थ हा नाही की, तुम्ही एकट्यानेच त्यास तोंड द्यावे. आयुष्याच्या कुठल्याही पायरीवर एखाद्याची मदत घेणे हे तुमचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्हाला स्वतःचं सुख निवडण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य आहे. घराबाहेर पडा, मैत्री करा, सकारात्मक विचाराची माणसं जोडा. आपल्या अडचणींबद्दल संवाद साधा. तुम्हाला कळणारही नाही व तुमच्या अडचणी कुठच्या कुठे विरून जातील.

२. साधा सरळ जीवनमंत्र

जगण्याला विनाकारण किचकट करू नका. सोपे निर्णय घ्या. साधा सरळ दृष्टीकोन बाळगा. एकदा तुम्ही स्थिरस्थावर झालात की तुम्ही थोडे अवघड ध्येय समोर ठेवा. नियमितपणे मनन करा. हे सुरुवातीस कठीण जाईल कारण, असं काही न करता स्तब्ध बसून राहणे सोपं नाही. पण हळूहळू तुम्हाला याचा प्रभाव तुमच्या सुधारित मनःशांतीवर दिसून येईल.

३. स्वतःसाठी वेळ काढा

स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे काहीही असू शकते. संध्याकाळी फक्त स्वतःसाठी केलेला आल्याचा चहा किंवा फोनवर लावलेली रफीसाहेबांची गाणी किंवा रोज सकाळी बागेत मारलेला फेरफटका. असं काहीही जे तुम्हाला समाधान देतं. लक्षात ठेवा जर तुम्हीच तुमच्यावर प्रेम करणार नाहीत तर दुसऱ्याने करण्याची तरी अपेक्षा का बाळगावी.

४. मनाचं दार खुलं करा

स्वतःला मानसिक बंधनात जखडून ठेवू नका. मनाभोवती कुंपण बांधल्याने दुःख वेशीबाहेर थांबतं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साफ चूक आहात. मित्र मैत्रिणींना आपल्या वैयक्तिक जीवनात समाविष्ट करून घ्या. दुःखाच्या भीतीने स्वतःला आनंदापासून परावृत्त करणे आरोग्यास अपायकारक असते.

५. आपण देव नाही

आयुष्यातील सगळ्याच घडामोडींवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. हे अहंकाराचं लक्षण आहे आणि अहंकाराने आनंद पदरी पाडता येत नाही. काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात हे एवढं जरी स्वीकारलं तरी सगळं काही सोपं होऊन जातं.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.