Now Reading:
शाळेतले दिवसच बेस्ट होते हे पटवून देणाऱ्या ५ गमतीदार गोष्टी
शाळेतले दिवसच बेस्ट होते हे पटवून देणाऱ्या ५ गमतीदार गोष्टी

जर जगात टाइम मशीन असती तर आपण सगळ्यांनीच ती शाळेच्या बाकावर परत जाऊन बसण्यास वापरली असती. प्रत्येकाला हेच वाटतं की त्यांची शाळा बेस्ट होती, त्यांनीच काय तो दंगा केला, त्यांचेच किस्से सर्वात भारी. त्या काळचा साधेपणा, विचारांची सहजता, मैत्रीतील निखळता या सगळ्याची आठवण झाली की डोळ्यात चटकन पाणी तराळतं. पण हे असं का? ह्याचा विचार कधी केलात का? घेऊ एक मागोवा आयुष्यातील या रम्य कोड्याचा.

१. दररोज मित्र मैत्रिणींना भेटता यायचं.

शाळेत अभ्यास करायचा कंटाळा आला तरी मित्र मैत्रिणी सोबत आहेत त्याचा आनंद असायचा. जर एखाद्या दिवशी कोणी शाळेत आलं नाही तर एकटं एकटं वाटायचं. आपल्या खास सवंगड्याचा बाक रिकामा दिसला की मनाला जी उदासिनता भेडसावायची त्याची तुलना होणे शक्य नाही. कदाचित म्हणूनच मोठेपणी हे सवंगडी सोबत नसल्यामुळे एकटं वाटतं.

२. पी. टी. चा तास

तुम्ही पूर्ण आठवडा त्या एका खेळाच्या तासाची वाट बघायचात. मैदानात खो खो, कब्बडी, क्रिकेट खेळायला मिळायचं. पीटीच्या शिक्षकांची नजर चुकवून दंगामस्ती करायची मजा काही निराळीच!

३. पहिलं प्रेम

खोडरबर पहिल्या प्रेमासारखा असतो. पहिल्या काही दिवसात तो खूप जपला जातो पण आपल्याकडूनच तो कधी हरवून जातो कळतही नाही. तुमच्यातील किती जणांना शाळेच्या वर्गात प्रेम सापडलं आणि तिथेच हरवलं पण? या गोड गुलाबी आठवणी उलटून कितीही काळ मागे पडला तरी वहीतल्या मोरपिसासारखं मनातील त्यांचं स्थान सदैव स्पेशल राहील.

४. सुट्या

दिवाळी, नाताळ, गर्मी च्या सुट्ट्या, अश्या अनेक सुट्ट्या वर्षभर येतच असत. आता जर सुट्टी घेऊन कुठे लांब जायचं म्हंटलं तर आधी १० वेळा विचार करावा लागतो. बॉस राजी होईल का? मित्र टांग तर देणार नाहीत ना? सगळे काही  व्यवस्थित झाल्यावरही शेवटी मामाचा गाव तो मामाचा गाव.

५. टेन्शन मुक्त आयुष्य

अभ्यास, शिक्षण, मस्ती-मजा याव्यतिरिक्त फार काही टेन्शन्स नव्हते. रोज सकाळी उठल्यावर गणिताच्या तासाच्या गृहपाठापलीकडे फारसा काही विचार मनात घोळवतच नसे. शाळेत जायचं, अभ्यास करायचा, मस्ती करायची, खेळायचं, खायचं झोपायचं हे एवढंच आयुष्य. यापलीकडे होता स्वप्नांचा दुसरा देश, जिथे पोहचून अनेक लोकांना वाटतं की शाळाच बरी होती.

Input your search keywords and press Enter.