Now Reading:
सांगाडे, स्वर्गाकडे जाणारा रस्ता अशा दंतकथांनी नटलेली ही भारतातील रहस्यमय ठिकाणे
सांगाडे, स्वर्गाकडे जाणारा रस्ता अशा दंतकथांनी नटलेली ही भारतातील रहस्यमय ठिकाणे

भारतातील गावागावांत निरनिराळ्या रूढी परंपरा प्रसिद्ध आहेत. यातल्या बऱ्याच किस्से कहाण्यांना शास्त्रीय पार्श्वभूमी आहे. तसेच अनेक दंतकथांनी या ठिकाणांचा इतिहास नटलेला आहे. तर जाणून घेऊ अशीच पाच रहस्यमय ठिकाणे

लेपाक्षीचा लटकता खांब, आंध्र प्रदेश

लेपाक्षी भारतातील स्थापत्यकलेचं एक आगळंवेगळं रहस्य आहे. येथील भिंतीवरील कोरीवकाम, खांब रहस्यांनी ठासून भरलेत. या मंदिरामध्ये एक असा खांब आहे जो हवेत लटकतो. हा खांब जमिनीला स्पर्श करत नसल्यामुळे तो हवेत लटकत असल्यासारखे वाटते.

दूरदूरचे अनेक पर्यटक हे पाहायला येतात. या खांबाखालून एखादी वस्तू बाहेर काढण्यास यश आल्यावर त्या व्यक्तीचे नशीब खुलते, असं म्हटलं जातं.

लेपाक्षीला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. जेव्हा जटायू पक्षी आकाशातून पडला तेव्हा तो श्रीरामाला या ठिकाणी भेटला होता. त्यावेळी राम जटायूला म्हणाला की, ‘ले पक्षी’ म्हणजे ‘उठ, पक्षी’.

जतिंगा, आसाम

आसाममधील हे निसर्गसौंदर्याने नटलेलं गाव. इथलं थंड हवामान, हिरवीगार वनराई यासाठी तर ही जागा प्रसिद्ध आहेच पण यासोबतच इथे मान्सून दरम्यान एक विक्षिप्त प्रकार घडतो.

पावसाळ्यात सुर्यास्तानंतर स्थलांतर करणारे पक्षी आकाशातून जमिनीकडे झेप घेत येथे जीव देतात. ते असं का करतात यामागचं मूळ कारण काय हे कोणालाच ठाऊक नाही. स्थानिकांचं असं म्हणणं आहे की, या पक्षांवर रहस्यमय शक्तींचा प्रभाव आहे. तर वैज्ञानिक म्हणतात की, पावसाळी धुक्यामुळे त्यांची दिशा ओळखण्याची क्षमता क्षीण होते व ते थेट जमिनीला जाऊन भिडतात.

काहीही म्हणा पण यातून हे सिद्ध होत नाही की, पक्षी रात्रीच का प्रवास करण्याचा निर्णय घेतात किंवा दरवर्षी ते एकाच जागी कसे अडकतात.

मॅग्नेटीक हिल, लडाख

गाडी चालवताना नेहमी सांगितलं जातं की, उतारावर गाडी उभी करताना हँडब्रेक खेचावा म्हणजे गाडी उतारावरून खाली जाणार नाही. पण इथे मात्र गाडी खाली नाही तर आपोआप चढावावर चालत जाते.

हा रस्ता एकेकाळी स्वर्गाशी जोडलेला होता असे काहींचा विश्वास आहे. तर चुंबकीय लहरींमुळे गाड्या वरच्या बाजूला खेचल्या जातात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. तर हा एक आभासी खेळ असल्याचे काहींचे मत आहे. चढावासारखं दिसणारं हे दृष्य खरंतर उतार आहे. काहीही असो ही गोष्ट मात्र फार मजेदार आहे.

शेट्टीहल्ली, कर्नाटक

कर्नाटकातील शेट्टीहल्ली रोझरी चर्चला ड्राउनिंग चर्च म्हणजेच बुडतं चर्च असंही संबोधलं जातं. एकोणीसाव्या शतकात फ्रेंच धर्मप्रचारकांनी बनवलेलं हे चर्च इथे तलाव बांधल्यावर लोकांनी वापरणं सोडून दिलं. तेव्हापासून पावसाळ्यात हे चर्च अर्धवट पाण्याट बुडालेलं असतं. गोथिक स्थापत्यकलेवर आधारित हे चर्च आजकाल रहस्यवेड्या तरूणांना फार आकर्षित करतंय.

स्केलेटन लेक, उत्तराखंड

उत्तराखंडच्या पर्वतरांगांमधील हे बर्फाळ रुपकुंड तलाव सध्या ट्रेकर्समध्ये पसंतीचं ठिकाण बनत चाललंय. हे तलाव केवळ २ मीटर खोल असून वर्षभर ते बर्फाने झाकलेले असते. पण जेव्हा इथला बर्फ वितळतो तेव्हा कुंडाच्या तळाशी असलेले मानवी हाडांचे सांगाडे पाहायला मिळतात.

कनौजचे राजा जसधावल हे त्यांची गर्भवती पत्नी आणि नर्तकांसोबत नंदादेवीला यात्रेसाठी जात होते तेव्हा त्यांच्यासोबत ३०० यात्री वादळात अडकले आणि एकत्रितपणे रुपकुंडात पडून बुडाले. आज जी तलावात हाडे दिसतात ती याच यात्रेकरींची आहेत, अशी कथा येथील स्थानिकांमध्ये प्रचलित आहे.

Input your search keywords and press Enter.