‘दंगल’ सारखा चित्रपट देशाला प्रेरणा देण्याचं काम करत असतानाच, महाराष्ट्रात अश्याच कथा अस्तितवात येत आहेत. अशीच एक कहाणी आहे महाराष्ट्रातल्या ज्योतिका पाटेकर (४८) आणि वैभवी पाटेकर (१७) या धाकड मायलेकींची.
स्वप्नांना लागला ब्रेक
रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या ज्योतिका आणि वैभवी या मायलेकी पॉवर लिफ्टिंगसाठी ओळखल्या जातात. खरंतर, ज्योतिका या लग्नापूर्वी पॉवर लिफ्टिंग करायच्या. मात्र, लग्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्वप्नांना राम राम ठोकला आणि आपल्या पतीला सॅण्डविचच्या व्यवसायात मदत केली. जवळपास २६ वर्षे त्या हे काम करत होत्या. पण, वैभवीमुळे त्यांच्या स्वप्नांना नवी पालवी फुटली.
स्वप्नांना नवा जन्म
सकाळच्या वेळेस ज्योतिका त्यांच्या स्टॉलवर काम करतात. आणि वैभवी एन.एम. जोशी विद्याभवनमध्ये १२वी मध्ये शिकते. नोव्हेंबर २०१६ रोजी वैभवी जिल्ह्यात पहिली अाली. तिने १९० किग्रॅ – ७० किग्रॅ स्क्वॉट लिफ्टिंग, २५ किग्रॅ बेंच प्रेस आणि ८५ किग्रॅ डेड़लीफ्ट वजनी गटामध्ये प्रथम स्थान मिळवलं.
राज्य पातळीवर चमकदार कामगिरी
राज्य पातळीवरती जाण्यासाठी वैभवीने मुंबईमध्येही आपली कामगिरी दाखवली. जळगावमध्ये झालेल्या राज्य पातळीवरील स्पर्धेत वैभवी चौथ्या क्रमांकावर अाली. तर, या क्षेत्रात पुनर्पदार्पण केलेल्या ज्योतिका यासुद्धा पॉवर लिफ्टिंगमध्ये चॅम्पियन झाल्या आहेत. जळगावमधीलच स्पर्धेतील खुल्या गटात त्यांनी सुवर्ण पदक पटकावले.