Now Reading:
‘स्वतःला दुय्यम वागणूक देणं सोडा’ प्रिया बापटचा जागतिक महिला दिनानिमित्त मोलाचा संदेश
‘स्वतःला दुय्यम वागणूक देणं सोडा’ प्रिया बापटचा जागतिक महिला दिनानिमित्त मोलाचा संदेश

आपला देश हा पुरुषप्रधान देश असूनही आता प्रत्येक क्षेत्रात महिला आगेकूच करत असल्याचे पाहायला मिळते. कठीणातील कठीण कामात महिलांनी पुढाकार घेऊन त्यांचे कर्तृत्व जगाला दाखवले आहे. अवनी चतुर्वेदी हे नुकतेच ताजे उदाहरण आहे. भारतीय वायूदलातील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी ‘मिग २१’ हे लढाऊ विमान उडवत भारतीय संरक्षण दलात नुकताच एक नवा इतिहास रचला.

‘वुमन स्ट्राँग, मदर स्ट्राँग, सिस्टर स्ट्राँग देन कंट्री स्ट्राँग’ हे ‘पॅडमॅन’ चित्रपटातील वाक्य खूप अर्थपूर्ण आहे. देशातील स्त्रिया जेव्हा त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जातील तेव्हाच देश खऱ्या अर्थाने प्रगतिपथावर चालू लागेल. हाच संदेश अभिनेत्री प्रिया बापट हिने ‘नेटनारी’ आणि ‘नेटवर’च्या वाचकांना तिच्या छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या सल्ल्यातून दिला आहे.

वय, लिंग याचा विचार न करता समोरच्याच्या मताला महत्त्व देणे गरजेचे?

याविषयी प्रिया म्हणते, माझे आई-बाबा आणि आम्ही दोघी बहिणींमध्ये एका पिढीचे अंतर आहे. कारण माझे बाबा जवळपास ४३ आणि आई ३४ वर्षांची होती तेव्हा त्यांचे लग्न झाले. त्यामुळे आमच्यात तसे पाहायला गेले तर ४० वर्षांचा जनरेशन गॅप आहे. पण तरीही ते आजच्या पिढीतीलच वाटतील असे वागतात. त्यांनी कधीच आम्हाला मुली म्हणून वेगळी वागणूक दिली नाही.

“मुळात समानता ही पुरुष-स्त्रीपर्यंत मर्यादित नसते.”

तर वय आणि समजूतदारपणा यातही समानता महत्त्वाची असते. लहानपणी आम्ही आयुष्यात खूप चढउतार पाहिले आहेत. पण आमच्या घरात कोणतीही गोष्ट कमी जास्त झाली किंवा काहीही झालं तरी आमचे आई-वडील कोणत्याही विषयावर आमचे मत घ्यायचे आणि त्यांचेही विचार सांगायचे. ही सवय मला जवळपास मी पाचवीत असल्यापासूनच लागली. समोरच्याचे वय, लिंग याचा विचार न करता त्याच्या मताला किंमत देण्यामुळे माणसातला आत्मविश्वास टिकून राहतो. ही समानता फार गरजेची आहे. खरंतर मुलगी किंवा मुलगा असा भेद न करता समोरच्याच्या मताचा विचार करणे, हा खूप मोठा संस्कार माझ्या आई-वडिलांनी आमच्यावर केला. मला वाटतं की अशा संस्कारांची सुरुवात मुळात आपल्या घरापासूनच होते.

कास्टिंग काउच हे सर्वच क्षेत्रात आढळतं मग केवळ चित्रपटसृष्टीवरच कलंक का?

बऱ्याचदा केवळ चित्रपटसृष्टीमध्येच लैंगिक सुखाची मागणी केली जाते असे म्हणतात. पण मला वाटतं, हा प्रकार हॉटेल इंडस्ट्री, जाहिरात विभाग, बँका, मोठ्या कंपन्या, हॉस्पिटल मुळात जिथे सत्ता नि सामर्थ्य आहे आणि तुमची काहीही करण्याची तयारी असल्याची भावना जिथे आहे तिथे या गोष्टी घडतातच. त्यामुळे केवळ चित्रपटसृष्टीतच असं घडतं हा समज चुकीचा आहे. याबतीत कोणतेही क्षेत्र चांगले किंवा वाईट असे वर्गीकरण करता येत नाही.

“पण, मला वैयक्तिकदृष्ट्या हे चुकीचं वाटतं.”

कारण माझ्यासाठी काम मिळवणे आणि शरीर संबंध ठेवणे या दोन्ही गोष्टींचा काडीमात्र संबंध नाही. मला जे काम मिळेल ते माझ्या कलागुणांवर मिळायला हवं. केवळ मी कोणाला शरीर सुख देत नाही म्हणून मला काम मिळत नाही, असे असेल तर मला काम मिळाले नाही तरी चालेल, या मताची मी आहे. एकतर मला असा कधी अनुभव आला नाही आणि आला तरी माझं करिअर घडवण्यासाठी मी असं काही पाऊल उचलणार नाही.

माझी कला, मेहनत आणि माझं काम हे शरीर आणि रुपाच्या सौंदर्यापेक्षा खूप मोठं आहे. कोणतीही गोष्ट मी करत असेन तर ती स्वेच्छेनेच केली पाहिजे आणि जर मी ती करत नसेन तर तीसुद्धा माझीच निवड असेल. शेवटी माझ्यासाठी माझं मत अधिक महत्त्वाचं आहे.

नेटनारीच्या महिलांना महत्त्वाचा संदेश

मी नेटनारीच्या महिलांना अगदी साधी आणि सोपी गोष्ट सांगू इच्छिते. तुम्हाला जर स्वतःच सशक्तीकरण करायचे असले तर पहिले आधी घरातले जेवल्यानंतर मी जेवते ही गोष्ट बंद करा. तुम्ही माणूस आहात, तुम्हाला भूक लागली की तुम्ही जेवायचं. घरातले पुरुष जेवल्यानंतर मी जेवेन हा महिलांनी स्वतःवर लादलेला नियम आधी मोडला पाहिजे.

 

आपण स्वतःला दुय्यम वागणूक देणं सोडलं पाहिजे. स्त्री स्वतःची स्वतः काळजी घ्यायला शिकली तर तिला इतर कोणाची गरजच लागणार नाही. मी कोणताही मोठा सल्ला न देता अगदी घरगुती सल्ला देतेय. कारण तुमचं शारीरिक स्वास्थ्य नीट नसेल तर मानसिक स्वास्थ्य नीट कसं राहणार?

All images have been taken from Priya Bapat’s Facebook page

The interview has been exclusively given by Priya Bapat to Netvar. You can use it by giving appropriate credits. 

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.