Now Reading:
रेसिपी : हळदीच्या पानातील सुवासिक पातोळ्या
रेसिपी : हळदीच्या पानातील सुवासिक पातोळ्या

गणपती बाप्पाला मोदकांसमवेत पातोळ्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. त्यात हळदीच्या पानातील सुवासिक पातोळ्यांची गोष्टच काही निराळी असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हळदीच्या पानांना चांगला बहर येतो. विशेष म्हणजे पातोळ्या या मोदकांच्या प्रकारात मोडत असल्या तरी यासाठी तांदूळ मात्र नवीन असलेलेच वापरावेत. जुन्या तांदळाचा वापर करू नये.

साहित्य

१ वाटी तांदळाचे पीठ, १ कप किसलेला नारळ, अर्धा कप चिरलेला गूळ, चिमूटभर वेलचीपूड, २ चमचे साजूक तूप, मीठ चवीनुसार, हळदीची ताजी पाने

कृती

एका पॅनमध्ये ओल्या नारळाचा किस, गूळ, वेलचीपूड एकत्र शिजवून मोदकासाठी करतात तसे सारण करून घ्यावे. गूळ विरघळला व थोडे सुकले की सारण झाले म्हणून समजावे.

पातोळ्यांच्या आवरणासाठी एका भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ घालावे. त्यानंतर थोडे-थोडे पाणी घालत याची थोडी जाडसर पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट जास्त पातळ किंवा अती जाडसर होणार नाही याची काळजी घ्यावी.

हळदीच्या पानाला थोडे तूप किंवा पाणी लावून त्यावर तांदळाची पेस्ट चमच्याने जमेल तितकी पातळ पसरावी.

पेस्ट पसरल्यानंतर पानाच्या एका बाजूवर सारण पसरून पान दुमडा.

सर्व पाने तयार झाल्यावर मोदक उकडतात त्याप्रमाणे उकडवून घ्या.

गरम गरम पातोळ्यांवर तूप सोडून ताव मारण्यास हरकत नाही. मात्र खाताना हळदीचे पान काढायला विसरू नका.

पाककृतीसाठी खालील व्हिडीओ पाहा.

 

 

Input your search keywords and press Enter.