Now Reading:
तुमचं मुल मानसिक तणावात असल्याची आठ लक्षणे व त्यावर उपाय
तुमचं मुल मानसिक तणावात असल्याची आठ लक्षणे व त्यावर उपाय

मुलांच्या मनात काय दडलंय हे नेमकं सांगणं फार कठीण. अशात ती वयात येत असताना किंवा कसल्यातरी दबावाखाली असताना पालकांपासून आणखीच दुरावत जात असतात. अशावेळेस त्यांच्या मनातील घालमेल ओळखणं अजूनच अवघड होऊन जातं. यासाठीच तुमचं मुल तणावात आहे की नाही हे जाणण्यासाठी खालील आठ लक्षणांना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

१. भयानक स्वप्नं पडणे

रात्री झोप न लागणे किंवा वाईट स्वप्न पडणे ही तणावाची लक्षणे असतात. अशा प्रसंगात त्यांना इतर मुलांच्या अशाच अनुभवांबद्दल गोष्टी सांगितल्यास त्यांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल.

२. अभ्यासात लक्ष न लागणे

शैक्षणिक किंवा सामाजिक दबावामुळे मुलांच्या मनावर दडपण येऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये अवांतर गोष्टींमध्ये सहभागी झाल्याने मुलांना खुलण्यास मदत होते. तसेच त्यांना कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं तसेच यावर कसं नियंत्रण ठेवावं हे समजावून द्या. अभ्यास आणि परीक्षा महत्त्वाच्या आहेतच पण यासोबत मुलांचं मानसिक स्वास्थ्यही तितकंच महत्त्वाचं आहे.

३. आक्रमकतेमध्ये अचानक वाढ

मानसिक तणावात असल्यावर काही मुलांची वागणूक एकदम आक्रमक होते. राग आल्यावर समोरच्याला चावणे, लाथा मारणे किंवा अपशब्द उच्चारणे यासारख्या गोष्टी करू ते लागतात. त्यांच्यात संयम उरत नाही. अशा वेळेस त्यांच्याशी बोलण्याने काही फरक पडत नसेल तर त्यांना पुस्तके वाचायला द्या किंवा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

४. बिछाना ओला करणे

ज्या मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असते त्यांच्या शौचाच्या वेळेचं संतुलन बिघडतं. त्यामुळे त्यांना अवेळी लघवीला होतं. तसेच अशा वेळेस त्यांना समजावून द्या की यात काही वावगं नाही. सोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.

५. उत्तेजितपणा

जेव्हा मुलांना तणाव असह्य होतो तेव्हा त्यांच्या वृत्तीत नकारात्मकता येते. उद्धटपणा, हट्टीपणा, मनस्थितीमध्ये वारंवार बदल हे कोणत्यातरी समस्येचे संकेत आहेत. अशा परिस्थितीमधून पाल्याला बाहेर पडण्यास मदत करावी. मन शांत करणारं संगीत, व्यायाम किंवा काहीही जे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेला बाहेर फेकण्यास मदत करेल.

६. एकटेपणा

मित्रपरिवारापासून लांब राहणे, स्वतःच्याच जगात हरवणे ही मानसिक तणावाची लक्षणे आहेत. कदाचित त्यांना शाळेत, घरात किंवा बाहेर मित्रांमध्ये कोणीतरी त्रास देत असेल. त्यांच्या खास मित्रांशी किंवा शिक्षकांशी वरवर चर्चा करून पाहा.

७. भूक न लागणे

मूल तणावात असल्यावर मनाची चलबिचल होणे, अस्वस्थपणा, भूक न लागणे किंवा जास्त भूक लागणे याप्रकारचे बदल दिसू लागतात. अशा वेळेस मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे कधीही चांगले.

८. लहानसहान गोष्टीवर प्रखर प्रतिक्रिया देणे

सतत दबावाखाली असल्याने मुलांची घुसमट होऊ शकते. अशा वेळेस बारीकसारीक गोष्टीवर चिडचिड करणे, चटकन डोक्याचा पारा चढणे यासारख्या गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागतात. मुलांना व्यक्त होण्याची मोकळीक द्या. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा.

Input your search keywords and press Enter.