Now Reading:
नोकरी सांभाळून मृतदेहांची विल्हेवाट लावणारी महिला पोलीस शिपाई
नोकरी सांभाळून मृतदेहांची विल्हेवाट लावणारी महिला पोलीस शिपाई

मुंबई पोलीस दलात अनेक महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असतील. परंतु एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या आगळ्यावेगळ्या कामाने सर्वाचे लक्ष वेधले आहे. मुख्य म्हणजे असे आगळेवेगळे काम करणारी ती एकमेव महिला कर्मचारी आहे. जे काम करायला पुरुषही तयार होत नाही, असे काम ती करते. हे काम म्हणजे रेल्वेतल्या बेवारस मृतदेहांचे विल्हेवाट लावण्याचे. हे काम करणाऱ्या या मर्दानी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे नयना दिवेकर. जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या नयना या मुंबईतील चुनाभट्टी येथे राहणार्‍या आहेत.

रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेवारस मृतदेहांवर निर्भयतेने आणि माणुसकीच्या भावनेतून अंत्यसंस्कार करणा-या रेल्वे पोलीस सेवेतील महिला पोलीस शिपाई नयना यांच्या कार्याचा आदर्श इतरांनीदेखील घेण्यासारखा आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपली पोलीस शिपाईची नोकरी सांभाळून रेल्वे अपघातातील ५०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून समाजसेवेचे नवे उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले. 

३५ वर्षांच्या नयना कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या अपघाती मृत्यू विभागात काम करतात. अपघातातील मृतदेहांचे विल्हेवाट लावण्याचे काम त्या करतात. किळसवाणे, भयप्रद वाटणारे काम त्या अगदी उत्कृष्टपणे करतात. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांचा जर वारसच नाही मिळाला तर अशा मृतदेहाची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावली जाते. पण किमान ते काम विधिवत आणि सन्मानाने व्हावं यासाठी नयना पुढाकार घेतात. बेवारस मृतदेह कुठल्या धर्माचे आहेत याची माहिती डॉक्टरांकडून तसेच अन्य कागदपत्रांवरून मिळवल्यानंतर त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार त्यावर त्या अंत्यसंस्कार करते.

या कामाचे मला समाधान वाटते. निपचित पडलेल्या चेतनाहीन शरिराची काय भीती वाटणार? मी पुण्याचे काम करत आहे. -नयना दिवेकर

अशा पध्दतीने आपल्यातील माणुसकीचे दर्शन इतरांना घडवणाऱ्या रेल्वे पोलीस शिपाई नयना दिवेकर यांना महिला दिनानिमित्त नेटवरचा सलाम.

Input your search keywords and press Enter.