Now Reading:
एकेकाळी पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या तिचा जगातील ५० सर्वश्रेष्ठ महिला उद्योजकांमध्ये समावेश
एकेकाळी पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या तिचा जगातील ५० सर्वश्रेष्ठ महिला उद्योजकांमध्ये समावेश

एका मध्यमवर्गीय कुटुंबातून वर येऊन जगातील घडामोडींवर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणे काही सोपी गोष्ट नाही. एखाद्या महिलेसाठी तर ही त्याहून कठीण गोष्ट आहे. मोएलिस इंडियाच्या सीईओ मनिषा गिरोत्रा यांची जगातील टॉप ५० महिला उद्योजकांत निवड झाली. त्यांच्या महत्त्वकांक्षेची, संघर्षाची आणि समर्पणाची कहाणी एका बॉलिवूडच्या बायोपिक चित्रपटाहून कमी नाही.

मध्यमवर्गीय कुटुंबातील बालपण

मनिषा गिरोत्रा यांचं दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात बालपण गेलं. त्यांच्या यशाचं सर्व श्रेय त्या आपल्यावर घडलेल्या संस्कारांना देतात. त्यांचे वडील कायम त्यांना उत्तरोत्तर प्रगती करण्यास प्रवृत्त करत. त्यांच्या कुटुंबातील सर्व महिला कामाला जात. यामुळे मुलीने घराबाहेर पडणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं असल्या पुरोगामी संकल्पना त्यांच्यासाठी सर्वसामान्य होत्या.

जीवनावश्यक धडा

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाल्यावर त्यांची ग्रिंडले बँकेच्या इन्वेस्टमेंट बँकिंग खात्यात निवड झाली. इतर महत्वकांक्षी मुलींसारखीच त्यांचेही जग बदलण्याचे स्वप्नं होतं. पण कंपनीत रुजू झाल्यावर त्यांना कंपनीच्या स्टॉक स्टेटमेंट बनवायचं काम मिळालं. पंखे, टेबल, पेन्सिल यांचा हिशेब ठेवायचं काम दिलं जायचं. अधूनमधून त्या पिझ्झा डिलीव्हरीचंही काम करायच्या. पण आजही त्या या दिवसांना जीवनावश्यक धड्याच्या स्वरुपातच पाहतात.

महत्त्वकांक्षेचा पाठलाग

कॉलेजमध्ये असताना त्यांच्या वर्गात विद्यार्थ्यांचं प्रमाण ४० टक्के इतकंच होतं. त्यातल्या बहुतेक शिक्षिका किंवा परिचारिका झाल्या तर उरलेल्यांनी गृहिणी होणं पसंत केलं. पण मनिषा यांनी थोडक्यावर समाधान मानण्यास नकार दिला. सुरुवातीस बरेच जण त्यांच्या मतांना डावलत, त्यांच्या सल्ल्यांना गंभीरतेने घेत नसत. उद्योगातील महत्त्वाच्या निर्णयांबद्दल एखाद्या महिलेकडून सल्लामसलत करणे त्यांना फारसे पचनी पडत नसे. कामानिमित्त त्या सतत दिल्ली ते लंडन ये-जा करत. परदेशातही या न्यूनगंडाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. पुरुष त्यांच्याशी हस्तांदोलन न करता हात जोडून नमस्कार करत.

लॉंग डिस्टन्स लग्न

त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लग्न केले. त्यांचा नवरा संजय अगरवाल स्वतः मोठ्या बँकेत उच्चपदावर नोकरी करत असल्याने उशीरापर्यंत चालणाऱ्या कामाची पद्धत त्यांच्यासाठी नवीन नव्हती. लग्नानंतर त्यांची मुंबईला बदली झाली. नवरा दिल्लीत व आपण मुंबईत हे गणित कसं जुळवायचं हा प्रश्न होताच. संजयने आलेली संधी स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्या मुंबईत आल्या. वर्षभर ग्रिंडलेजमध्ये काम केल्यावर युनियन बँक ऑफ स्विर्त्झलँडमध्ये उडी घेण्याचा निर्णय घेतला. ३३व्या वर्षी त्यांनी UBS च्या सीईओ पदापर्यंत मजल मारली होती.

काम आणि मॉम

ताराच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली. मातृत्वाची जबाबदारी आणि सोबतच बँकेच्या अवाढव्य कामाचा बोजा अशी डबल इनिंग खेळण्याची त्यांच्यावर पाळी आली. त्याकाळी मॅटर्निटी लीव्हसुद्धा फक्त ३ महिन्यांची असायची. अशात ऑफिस आणि घर याला तारेवरची कसरत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तेव्हा पाळणाघरांची संकल्पनासुद्धा अस्तित्वात नव्हती. अशा परिस्थितीत त्या ताराला शेजारच्या हॉटेलमध्ये ठेवून कामावर जात असत.

करीअरची दुसरी इनिंग

यातूनच त्यांना त्यांच्या जुन्या बॉसकडून मोएलिस सुरु करण्याचा प्रस्ताव आला. २० वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी या नव्या आव्हानाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हे शुन्यातून विश्व उभारण्याचे आव्हान थोडे कठीण होते पण तेव्हाच्या आर्थिक मंदीने त्यांना स्थिरावायला बरीच मदत केली. तसेच त्यांच्या करिअरच्या या इनिंगमध्ये एक मुलभूत बदल त्यांना दिसून आला तो म्हणजे आता आयटी, उद्योग, बँक व पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा वावर प्रकर्षाने वाढला होता. या बदलाने त्या फार प्रभावित झाल्या.


आज मोएलिस बँकिंग क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे. त्याच्या यशात मनिषा यांचा सिंहाचा वाटा आहे. सध्या अशोक लेलँड, माइंड ट्री यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सल्लागार समितीवर आहेत. तसेच वोडाफोन, हिंदाल्को, युनायटेड स्पिरीट सारख्या कंपन्यांच्या मोठमोठ्या करारांमागे मनिषा यांचंच बुद्धिचातुर्य आहे.

जगातील ५० सर्वश्रेष्ठ उद्योजकांमध्ये त्यांचं नाव असंच नाही आलंय. आहे की नाही त्यांची कहाणी प्रेरणादायी?या असामान्य महिलेस नेटवर मराठीचा सलाम!

Cover Image Source: Facebook, Shutterstock

Input your search keywords and press Enter.