Now Reading:
देश हगणदारीमुक्त करण्यासाठी थर्माकॉलची शौचालये बांधणारा भन्नाट पुणेकर!
देश हगणदारीमुक्त करण्यासाठी थर्माकॉलची शौचालये बांधणारा भन्नाट पुणेकर!

रस्त्यावर उघड्यावरची घाण पाहून आपण जास्तीत जास्त तोंड फिरवून नाक बंद करून पुढे निघून जातो. फारफार तर उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना चार शिव्या हासडतो. पण पुण्यातील एका इसमाने देशाला हगणदारीमुक्त करण्याचा विडाच उचललाय.

लिमका बुक रेकॉर्ड

पुण्यातील रामदास माने या उद्योजकाने हगणगारीमुक्त भारत करण्याच्या मोहिमेस हातभार लावण्याच्या हेतूने देशभरात हजारो थर्माकॉलची शौचालये बांधली. माने यांची कंपनी थर्माकॉलवर सीमेंटचा थर चढवून अवघ्या दोन तासात शौचालय बांधून देते. आजवर त्यांनी देशभरात २२,००० हून अधिक शौचालये पुरवली आहेत. त्यांच्या कामाची नोंद २००७ च्या ‘लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्येही आहे.

अनोखा आहेर

माने ही शौचालये नवविवाहीत महिलांना आहेर म्हणूनही देतात. आजवर अशा २५ मुलींना त्यांनी ही शौचालये भेट म्हणून दिलीत, ज्यांना शौचालये बांधण्याचा खर्च परवडत नाही.

जगभरात सन्मान

माने यांचा हा व्यवसाय विना नफा, विना तोटा तत्वावर चालतो. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी सरकार व विविध संस्थांतर्फे असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यासोबतच त्यांना २०१६ चा इंडिया CSR चा ‘सॅनिटेशन लीडरशीप पुरस्कार’सुद्धा प्रदान करण्यात आला. भारतच नाही तर विदेशातही त्यांच्या कामाची नोंद घेण्यात आलीय. ऑस्ट्रेलिया व उरुग्वे मध्येही त्यांना सन्मानित करण्यात आलेय.

व्यवसायक्षेत्रातील प्रवास

सातारा जिल्ह्यातला त्यांचा जन्म, पार्ट टाइम काम करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. प्रसंगी बस स्टॅण्ड, फुटपाथवर रात्र काढली. पण आपल्या महत्त्वकांक्षेची कास सोडली नाही. त्यांनी १९९३ मध्ये थर्माकॉलच्या मशीन बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. आज ‘माने ग्रुप ऑफ कंपनीज’ ४५ देशांमध्ये आपल्या मशीन्सचा पुरवठा करतात. भारतातील ८० टक्के थर्माकॉल त्यांच्या मशीनपासून बनतो. त्यांच्या नावे थर्माकॉल रिसायकलींग मशीनचा पेटंटसुद्धा आहे. त्यांच्या कंपनीत ७० कर्मचारी काम करतात तसेच त्यांची वार्षिक उलाढाल ४० कोटींची आहे.

आपल्या व्यवसायिक व आर्थिक वृद्धीसोबत सामाजिक जाण असणारे व त्यासाठी जबाबदारीने काम करणारे रामदास माने यांसारखी माणसे देशाला लाभली तर चांगले दिवस दूर नाहीत.

Input your search keywords and press Enter.