Now Reading:
मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांत होणाऱ्या ५ स्वादिष्ट रेसिपी
मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांत होणाऱ्या ५ स्वादिष्ट रेसिपी

लहान मुलांना डब्याला रोज काय नवीन द्यायचे या प्रश्नाने जगभरातील मातांना भंडावून सोडलंय. त्यात सकाळच्या घाईत करून करून करणार तरी किती? म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलोय या झटपट होणाऱ्या स्वादिष्ट रेसिपीज.

१. दही वेज सॅण्डवीच

१०० ग्रॅम दही गाळून घ्या. त्यात एक चिरलेली शिमला मिरची, दोन चमचे मक्याचे दाणे, चिरलेला कांदा, अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी घालून नीट एकत्र करा. हे मिश्रण दोन ब्रेडच्या मधोमध भरून तूप लावून कुरकुरीत होईपर्यंत पॅनवर गरम करा. तयार सँडवीच केचअप सोबत डब्यामध्ये द्या.

२. रव्याचा टोस्ट

भांड्यामध्ये २ चमचे मलई फेटून घ्या व त्यात २ चमचे मक्याचे दाणे, १ चिरलेली शिमला मिरची आणि १ चिरलेला कांदा घालून चमच्याने ढवळून घ्या. तसेच अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट व एक चमचा रवा घालून पुन्हा ढवळा. तयार मिश्रण ब्रेडवर पसरवा. पॅन गरम करा व ब्रेडच्या ज्या बाजूने मिश्रण लावलेय त्या बाजूने गरम करा. शिजल्यावर टोस्ट परतून दुसऱ्या बाजूनेही शेक द्या. मिश्रणात मलई असल्याने तूप लावण्याची गरज नाही. तयार टोस्टचे ४ तुकडे करून डब्यात भरा.

३. दही ब्रेड रोल

१५० ग्रॅम दह्यामध्ये कोथिंबीर, १०० ग्रॅम मक्याचे दाणे, १०० ग्रॅम मोड आलेले मूग, २ बारिक चिरलेली शिमला मिरची, २-३ हिरवी मिरच्या, पाव चमचा काळी मिरी, अर्धा चमचा काळं मीठ, ३ उकडलेले बटाटे कुस्करून एकत्र ढवळून घ्या. हे मिश्रण १२ ब्रेड रोलसाठी पुरेसं आहे. ब्रेड स्लाइस भिजवून पाणी काढून घ्या. या ब्रेडमध्ये मिश्रण घालून वड्यासारखा गोळा करून घ्या व तेलात डिप फ्राय करून घ्या. रोल सोनेरी होईपर्यंत तळा. तयार आहे दही ब्रेड रोल. हे चटणी, केचअप, सॉस बरोबर खायला द्या.

४. आलू वेज चीला

१ मोठा उकडलेला बटाटा उभा बारीक चिरून घ्या. त्यात चिरलेली हिरवी मिरची, १ चिरलेला कांदा, १ चिरलेली शिमला मिरची,पाव चमचा काळी मिरी, अर्धा चमचा मीठ, दोन चमचे मक्याचे पीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. पॅनवर १ चमचा तेल गरम करा. त्यात तयार मिश्रण टाकून नीट गोलाकार पसरवून घ्या. एका बाजूने शिजल्यावर पलटा. नीट शिजल्यावर गॅस बंद करा आणि तयार आहे आलू वेज चीला.

५. दही मॅकरोनी

अर्धा पेला फेटलेल्या दह्यात अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला घालून व्यवस्थित ढवळून घ्या. मिश्रणात १०० ग्रॅम उकडलेली मॅकरोनी, २ चमचे मक्याचे दाणे, १ चमचा भाजलेले शेंगदाणे, १ चिरलेला कांदा आणि १ चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण नीट ढवळून घ्या. तयार मिश्रण फ्रिजमध्ये थंड व्हायला ठेवा. थंड झाल्यावर खायला द्या ही ऑइल फ्रि दही मॅकरोनी.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.