Now Reading:
‘माझ्या नवऱ्याच्या बायको’ ने मराठी माणसाला दिलेले ९ महत्त्वाचे धडे
‘माझ्या नवऱ्याच्या बायको’ ने मराठी माणसाला दिलेले ९ महत्त्वाचे धडे

संध्याकाळी ८ वाजले की गृहिणी सर्व काही आटपून टिव्हीशी खिळून बसतात. टिव्हीवर जोरात सुरु असलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील अभिजीत खांडकेकर (गुरुनाथ सुभेदार) , रसिका सुनिल (शनाया) आणि अनिता दाते (राधिका सुभेदार) या त्रिशंकू कलाकारांच्या विलक्षण केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना विदर्भी भाषेशी आणि मालिकेतील पात्रांशी विशेष जवळीक निर्माण झालीय.

स्वतःचे प्रेम, अस्तित्व आणि संसार जपण्यासाठी विविध अडचणींना धाडसाने सामोरे जाणारी राधिका कुटुंबातील प्रत्येकाला कुठे ना कुठे स्पर्श करून जाते. काहींना तिच्यात एक आदर्श पत्नी दिसते तर काहींना आदर्श सून. दुसरीकडे नट्टापट्टा करण्यात रमणारी, दुसऱ्याच्या पैशावर उधळपट्टी करणारी शनाया आणि या दोघांमध्ये अडकलेला राधिकाचा नवरा गुरुनाथ असे साधारण या मालिकेचे स्वरुप. त्यांच्याभोवती असणारी रेवती, सुबोध, नानाजी ही पात्रेही प्रेक्षकांना तितकीच भावतात.

या मालिकेत येणारी नवनवीन वळणे काही ना काही धडा देऊन जातात. चला तर उलगडू ‘माझ्या नवऱ्याची बायको’च्या भावविश्वातील काही जीवनावश्यक धडे – 

१. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा. 

सर्वात पहिली आणि मुलभूत शिकवण म्हणजे प्रामाणिकपणा. आपल्या जोडीदाराच्या प्रेमाची जाणीव ठेवा. नाहीतर काय काय उचापत्या कराव्या लागतात हे गुरुनाथकडे पाहून लक्षात आलंच असेल. 

२. मातृभाषेचा न्यूनगंड बाळगू नये. 

इंग्रजाळलेले बोलणे म्हणजेच सुशिक्षितपणाचे लक्षण या विचाराला छेद देणारी राधिका. आपल्या खास नागपूरकर अंदाजात जेव्हा भल्या भल्यांची बोबडी वळवते तेव्हा तिच्याबद्दल मनोमन आदर निर्माण होतो. मातृभाषेचा न्यूनगंड न बाळगता आपल्या उत्कर्षासाठी तिचा एखाद्या धारदार अस्त्राप्रमाणे वापर करावा. 

३. प्रेम करण्यासाठी वयाची मर्यादा नसते.

रेवती आणि गुप्तेंच्या लग्नाची चर्चा तर मध्ये इतकी गाजलेली की ‘विरुष्का’लाही किंचित कॉम्प्लेक्स यावा. या जोडप्याचा मालिकेतील रोमान्स एकूणच फार मनमोहक आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे वय, नियम, मर्यादा ठरलेल्या असतात. अशात उतारवयाकडे झुकत चाललेल्या या प्रेमी युगुलाची कहाणी मनाचा ठाव घेणारी आहे. प्रेम कधी कुठे आणि कसे स्पर्शून जाईल याचा नेम नाही. 

४. तुमचा स्वतःवर विश्वास असल्यास काहीच अशक्य नाही. 

ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केले, जन्मजन्मांतरीची वचने दिली तोच नवरा पाठ फिरवून सोडून जातो. हा क्षण किती मनाला पोखरणारा असेल नाही? प्रेमात आपण स्वतःची ओळख हरवून बसतो. राधिकाचेही काही प्रमाणात तसेच झाले होते. मोठ्या निर्धाराने तिने आपल्या कोलमडलेल्या संसाराचे भग्नावशेष गोळा करून पुन्हा आपले अस्तित्व निर्माण केले. आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या कंपनीला यश मिळवून दिले. 

५. अख्या जगाने पाठ फिरवली तरी कुटुंब पाठ फिरवत नाही.

संकटाच्या काळात लोक आपला खरा चेहरा दाखवतात. पळवाट दिसता धूर्तपणे पोबारा करतात. पण कितीही मोठी आपत्ती ओढवली तरी आपले कुटुंब आपल्या पाठीशी उभे असते. याचे सुरेख चित्रण या मालिकेतून पाहायला मिळते. उदा. नानाजी.

६. चकाकते ते सोने नसते. 

लोकांच्या दिसण्यावर जाऊ नये. काही माणसे दिसायला सुंदर असली तरी त्यांच्या मनात किती अंधार दाटला असेल याचा नेम लावता यायचा नाही. अशी माणसे आपल्या स्वार्थापोटीच सोबत असतात. 

७. महिलांना कमी लेखू नये. 

आपले घर, नाती-गोती सांभाळत व्यवसायातील पेचप्रसंगांना लीलया सोडवणारी राधिका पाहिली की एकच गोष्ट लक्षात येते की, गुरुनाथने राधिकाला कमी लेखून फार मोठी चूक केली. राधिका मसाल्यांची भरभराट पाहता महिलांना काहीच अशक्य नाही हे सिद्ध होते. 

८. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नये. 

राधिकासारखी सोन्यासारखी बायको असताना क्षणिक सुखाला भुलून गेलेला गुरुनाथ ‘संसारात काय करू नये’ याचे ज्वलंत उदाहरण आहे. आपल्या भूतकाळाचा विसर पडलेला गुरुनाथ जेव्हा राधिकाला यशाच्या शिखरावर पाहतो तेव्हा त्याला नक्की पश्चात्ताप होत असेल. 

९. असतील शिते तर जमतील भुते 

हा तर जगण्याचा नियमच आहे. जोवर तुमच्याकडे धन-संपत्ती आहे तोवर स्वार्थी स्वभावाची माणसे तुमच्या अवती भोवती असतील. एकदा का तुमच्या बँक खात्याचा आकडा खालावला की तुम्हाला कोणी नाही विचारणार. यासाठी आपल्यासोबत असलेल्या माणसांना वेळीच ओळखा.

टिव्हीवर अनेक मालिका येत-जात असतात. त्यामध्ये विविध पात्रे विविध ढंगाने रंगवली जातात. त्यांच्या आयुष्याचे धागे दोरे प्रसंगी मजेदारपणे सादर केले जातात. प्रत्यक्ष जगात तसे घडेलच असे नाही पण तरीही यातून जे काही चांगले आत्मसात करता येईल ते करावे आणि उर्वरीत गोष्टी मनोरंजनाच्या नावाने सोडून द्याव्यात.

Cover Image Source: Zee Marathi

Input your search keywords and press Enter.