Now Reading:
किचन कॉर्नर- पुडला / बेसन चिला
किचन कॉर्नर- पुडला / बेसन चिला

नेहमी नाश्त्याला काय करावे असा प्रश्न पडतो ना? मुळातच नाश्ता म्हणजे दिवसातून सर्वात पहिले पोटात जाणारे इंधन असते. ते पौष्टिक आणि पोटभर असले पाहिजे असे पुरातन काळापासून सांगण्यात आले आहे. रोज रोज उपमा, पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी इतर प्रदेशातील पौष्टिक पदार्थ नाश्त्यासाठी खाण्यास हरकत नाही. म्हणूनच आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास गुजराती पद्धतीने केला जाणारा पदार्थ पुडला म्हणजेच बेसन चिला. चला तर मग हा खुसखुशीत पुडला कसा बनवायचा ते बघुया-

साहित्य

४ कप चण्याचे पीठ अथवा बेसन, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जीरे, अर्धा चमचा हळद, २ टोमॅटो, १ कांदा, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, इनो, १ पळी तेल, पाणी आणि चवीनुसार मीठ

कृती

प्रथम एका भांड्यात चार कप बेसन, लाल तिखट, जीरे, हळद, तेल आणि मीठ एकत्र घेऊन व्यवस्थित मिसळावे. नंतर मिक्सरमध्ये टोमॅटो, कांदा आणि पाणी एकत्र करून वाटून घ्यावे. पाणी अंदाजानेच वापरून मिश्रण जास्त घट्ट अथवा पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी.

आता हे मिश्रण बेसनच्या पीठात घालावे आणि व्यवस्थित एकजीव करावे. मग त्यात अर्धा पाकिट इनो टाकावे. जेणेकरून, पुडल्याला चांगली जाळी येईल.

आता तवा गरम करून त्यावर तेल घालावे. त्यावर हे मिश्रण घालून डोश्यासारखे पसरावे. पुडल्याची जाडी तुम्हाला हवी असेल तेवढी ठेऊ शकता.

पुडला एका बाजून खरपूस भाजल्यानंतर त्यावर चव येण्यासाठी बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात आणि गरमागरम चटणी अथवा रायता किंवा सॉसबरोबर खायला घ्यावा.

खास टिप

* इनो वापरणे हे सर्वस्वी तुमच्या इच्छेवर असून पुडल्यावर चांगली जाळी येण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

* मिश्रण एकत्र करताना एकाच दिशेने मिसळावे. त्याने पीठाचे गोळे तयार होत नाहीत.

All images sourced from StepIntoTheKitchen.

Input your search keywords and press Enter.