Now Reading:
सामाजिक बंधनांच्या लाटा ओलांडून के. सी. रेखा झाल्या देशातील पहिल्या मच्छीमारिण
सामाजिक बंधनांच्या लाटा ओलांडून के. सी. रेखा झाल्या देशातील पहिल्या मच्छीमारिण

मोठ्या हिम्मतीने खोल समुद्रात जाऊन जाळे फेकून मासे खेचताना सर्वांनीच कोळ्याला (पुरुषांना) पाहिले आहे. विचार करा, खोल समुद्रात अशाच एका छोट्या नावेवर आपणास एखादी बाई माशाचे जाळे ओढताना दिसली तर! मासेमारी सुरु होऊन शतके सरली. आजपर्यंत कोणत्याही महिलेने असे धाडस केले नाही. कदाचित समाजात स्त्रियांवर असलेली बंधने आणि त्यांची एक कमकुवत मनाची प्रतिमा याला जबाबदार असू शकते.

हे सर्व झुगारून देशात पहिल्यांदाच खोल समुद्रात जाऊन मच्छीमारी करण्याचा अधिकृत परवाना के.सी. रेखा यांना मिळाला आहे. त्या केरळमधील थिसूर जिल्ह्यातील चेतुवा येथे राहतात. त्यांचे पती पी. कार्तिकेयन अनेक वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. त्यांना चार मुले आहेत. कामगारांची कमतरता, पैशाचा तुटवडा आणि दर्यासागराची ओढ या सर्वांनी रेखा यांना हे क्रांतिकारी पाऊल उचलण्यास भाग पडले.   

कोणत्याही नौकानयन शास्त्राशिवाय हे जोडपे अरबी समुद्रातील उसळत्या लाटांचा मारा सोसत एकमेकांच्या मदतीने आपले घर चालवीत आहेत. कदालाम्मा देवीवर त्यांची फार श्रद्धा आहे. तेथील मच्छीमारांच्या मते देवीचा आशीर्वाद त्यांना किनाऱ्यावर सुखरूप परत आणतो.

‘सेन्ट्रल मरीन फिशरीज रिसर्च इंस्टीटयुट संस्थे’ने रेखा यांना मासेमारीसाठी आर्थिक आणि तांत्रिक गोष्टींची मदत केली. त्याचबरोबर मोठी मुलगी माया हिच्या बारावीच्या तयारीसाठी एक लाखाची मदत केली. पारंपरिक मासेमारी क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणाऱ्या रेखा आणि त्यांचे पती कार्तिकेयन या दाम्पत्याचे कार्य प्रेरणादायी आहे. 

All Image taken from Hindustan Times

Input your search keywords and press Enter.