Now Reading:
गुढी पाडव्याचं महत्त्व, प्रार्थना आणि निसर्गात होणारे बदल
गुढी पाडव्याचं महत्त्व, प्रार्थना आणि निसर्गात होणारे बदल

सुर्योदयाच्या वेळेस वातावरणात नवचैतन्य असते. म्हणून सुर्योदय झाल्यानंतर काही मिनिटांतच गुढीची पूजा केली जाते.

गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे किंवा रेशमी वस्त्र बांधले जाते. तसेच कडूलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, पुष्पहार आणि साखरेच्या गाठी बांधल्या जातात. त्यावर तांब्या-पितळेचे किंवा चांदीचे भांडे (तांब्या/गडू/फूलपात्र) बसवतात. गुढी उभारायची जागा धुवून-पुसून स्वच्छ केली जाते नि त्यावर रांगोळी काढून पाटावर गुढी उभी केली जाते. तयार गुढी दारात किंवा गॅलरीत लावली जाते.

गुढीच्या प्रत्येक घटकाला एक आध्यात्मिक महत्त्व आहे.

१. गुढी ज्या पाटावर उभारली जाते तो पाट जीवनातील स्थैर्याचे प्रतिक असतो. पाटावर ठेवलेली सुपारी नविन संकल्पाचे प्रतिक मानले जाते. त्याशेजारी ठेवलेले हळदी-कुंकू सौभाग्याचे प्रतिक आहे. तसेच सोबत ठेवलेला नारळ सिद्धीचे गुणधर्म दर्शवतो.

२. ज्या वेळूच्या काठीवर गुढी उभी केली जाते ते आपल्यातील सामर्थ्य दर्शवते. त्यावर बांधलेले रेशमी वस्त्र वैभवाचे प्रतिक आहे. त्यानंतर बांधलेली बत्ताश्यांची माळ किंवा साखरेच्या गाठी जीवनातील माधुर्याचा संदेश देतात. त्यासोबत असलेली कडूलिंबाची डहाळी आरोग्याची महती सांगते. तर पुष्पाहार मांगल्याचे प्रतिक आहे.

३. त्यावर ठेवलेला धातूचा कलश यशश्रीचे प्रतिक आहे.

गुढीची प्रार्थना

शास्त्रांनुसार गुढीची पूजा करताना व गुढी उतरवताना प्रार्थना केली जाते.

गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना

`हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणाऱ्या शक्ती,तील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणाऱ्या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे`, हीच आपल्याचरणी प्रार्थना !

गुढी खाली उतरवताना करावयाची प्रार्थना

`हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल, ती मला मिळू दे, हीच आपल्याचरणी प्रार्थना !

वसंत ऋतूला सुरुवात

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या जवळपास सूर्य वसंतसंपातावर येतो. संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू. इथून वसंत ऋतू सुरु होतो. यावेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. वसंत ऋतूच्या आधी येणाऱ्या शिशिर ऋतूत झाडांची पाने गळतात. तर वसंत ऋतूमध्ये पाडव्या दरम्यान झाडांना नवी पालवी फुटते. तसेच सभोवताली वनराई बहरलेली दिसते.

Cover Image Source: Shutterstock 

Input your search keywords and press Enter.