Now Reading:
जाणून घ्या, युद्धात स्वतःचाच पाय कापणाऱ्या बहादूर भारतीय सैन्य अधिकाऱ्याविषयी..
जाणून घ्या, युद्धात स्वतःचाच पाय कापणाऱ्या बहादूर भारतीय सैन्य अधिकाऱ्याविषयी..

आज भारतीय सैन्यदल संपूर्ण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक शूर, पराक्रमी जवानांच्या अविरत सेवेमुळे देशावर झालेले अनेक हल्ले परतवण्यात भारतीय सैन्य दलाला यश आले आहे. यासाठी कित्येक जवानांनी आपल्या प्राणाची आहुतीही दिली. कार्यदक्ष जवानांमुळेच आज भारतातील सामान्य नागरिक सुखाने झोपत आहेत. अशाच एका जवानाचा रोमांचित करणारा किस्सा जाणून घेणार आहोत. त्या धाडसी भारतीय सैनिकाचे नाव आहे मेजर जनरल इयान कारडोझ Major Gen Ian Cardozo.

कुकरीने पाय कापून घेतला

१९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान इयार कारडोझो हे गोरखा रेजिमेंटचे मेजर म्हणून तैनात होते. त्यावेळी त्यांचा एका भूसुरुंगावर पाय पडला. त्यामुळे स्फोट होऊन ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. हे एका बांग्लादेशी सैनिकाने पाहिले आणि त्यांना छावणीत आणले. त्यावेळी उपचारासाठी त्यांनी मदत मागितली; पण दुर्दैवाने तेव्हा त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे औषध उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांनी सैनिकांना आपला पाय कापण्यास सांगितले. पण सैनिकांनी तसे करण्यास नकार दिल्यामुळे कारडोझो यांनी शरीरात विष पसरु नये म्हणून त्यांच्याजवळ असलेल्या कुकरीने स्वतःच पाय कापून टाकला.

पाकिस्तानी डॉक्टराने केले उपचार

जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. पण तिथे एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने युद्धात पकडलेला पाकिस्तानी डॉक्टर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करेल असे त्यांना सांगण्यात आले. या गोष्टीला त्यांनी सुरुवातीला नकार दिला. पण वरिष्ठांनी समजूत घातल्यानंतर पाकिस्तानी रक्त न वापरण्याच्या अटीवर त्यांनी शस्त्रक्रिया करुन घेतली..

अपंगत्वावर केली मात

पाय कापून घेतल्यावर त्यांनी लाकडी पाय बसवला. पण विकलांग असल्यामुळे सैन्याने त्यांना सीमेवर नियुक्त न करण्याचा निर्णय घेतला. ते लाकडी पायाने सर्व कामे अगदी सहज करित असत. सैन्यात पुन्हा रुजू होण्यासाठी त्यांनी तंदुरुस्त चाचणीला सामोरे जाण्याचे ठरवले. त्यासाठी ६००० फूट उंचावरील हेलिपॅडही चढून दाखवले. त्यानंतर लडाखमधील बर्फच्छादित टेकड्यांवर त्यांची तंदुरुस्त चाचणी घेण्यात आली. त्यातही ते उत्तीर्ण झाले. मग शेवटी सैन्याने त्यांना बढती देण्याचे ठरवले.

अशा या तडाखेबंद व्यक्तिमत्वाला नेटवरचा सलाम!!!!!!!!!

Cover Image Source: Wikimedia Commons

Input your search keywords and press Enter.