Now Reading:
स्वार्थी माणसांना पहिल्याच भेटीत कसे ओळखावे?
स्वार्थी माणसांना पहिल्याच भेटीत कसे ओळखावे?

नात्यामध्ये फसवणूक झाल्यावर प्रचंड मनस्ताप होतो, नैराश्य येते. अनेक चित्रविचित्र विचारांनी डोके भंडावून सुटते. जर-तर, असे-तसे यासारख्या तर्कवितर्कांनी आपण स्वतःला विनाकारण त्रास देत असतो. मग वाटते ही गोष्ट वेळीच टाळता आली असती तर? ती फ्रेन्ड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केलीच नसती तर या माणसाशी भेट झालीच नसती, मग हा दिवस पहावाच लागला नसता. मग वाटते भेटणाऱ्या व्यक्तीस वेळीच ओळखण्याची दिव्य शक्ती असती तर किती मनस्ताप टळला असता ना?

तुम्हाला सांगितले की, अशी दिव्य शक्ती तुम्ही आत्मसात करू शकता तर? नवल वाटतंय ना? पण खालील गोष्टी वाचल्यावर तुम्ही नक्कीच यामध्ये पारंगत होऊ शकता.

१. नकारात्मक बोलणे 

संवाद साधताना बऱ्याचदा तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख होतो. एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्याबद्दल चांगले किंवा वाईट उद्गार काढणे हे त्या व्यक्तीच्या स्वभावगुणाचे लक्षण आहे. जी व्यक्ती आपले मित्र, सहकर्मी यांबद्दल सतत नकारात्मक उद्गार काढते अशा व्यक्तीपासून चार हात लांब राहणेच चांगले. 

२. कामापुरते मामा 

फक्त अडचणीत सापडल्यावर आठवण काढणाऱ्या व्यक्तीचा फोन उचलताना दहा वेळा विचार करावा लागतो की, आज काय नवीन घेऊन आलाय? समोरची व्यक्ती कामापुरती मामा आहे हे ओळखण्यासाठी त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्यापेक्षा हुद्द्याने कमी असलेली व्यक्ती किंवा आपली कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही अशा व्यक्तींशी ते कसे वागतात हे निरखून पहावे. 

३. पहिल्या भेटीतच संधी साधणे 

पहिल्याच भेटीमध्ये आपण समोरच्या व्यक्तीस त्यांचे परिवार, आवडीनिवडी, शिक्षण यासारख्या गोष्टी विचारतो. थेट त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा ठेवत नाहीत. स्वार्थी लोक सहसा संधी साधण्याच्या विचारातच असतात. 

४. आत्मकेंद्री

जी व्यक्ती समोरच्या माणसाचा विचार न करता फक्त स्वतःबद्दलच बोलत असते. ज्यांच्या प्रत्येक विचाराचा केंद्रबिंदू ते स्वतः असतात, अशी माणसे भविष्यात त्यांची गरज फिटली की तुम्हाला सोडून दुसऱ्याकडे वळतात. 

५. ऐकावे मनाचे

सगळे काही व्यवस्थित असते, बोलणे-चालणे सर्व रितसर असते पण मनात कुठेतरी काहीतरी सलते. अशा वेळेस आपल्या मनाचे ऐकणे कधीही चांगले. काही गोष्टी नकळतपणे नजरेआड होतात, पण मनात त्या गोष्टी झिरपत असतात. अशा परिस्थितीमध्ये मनाच्या भावनेचा मान राखणे गरजेचे आहे. 

यापुढे अशा आत्मकेंद्रीत स्वार्थी लोकांपासून सुरक्षित अंतर पाळा आणि भविष्यातील अपघात टाळा.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.