Now Reading:
लग्नात दागिने वापरण्याच्या काही टिप्स
लग्नात दागिने वापरण्याच्या काही टिप्स

लग्न.. हा प्रत्येक मुलीसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो. एका नव्या आयुष्याची सुरुवात ती या दिवसापासून करणार असते. पण, त्याचसोबत लग्न आणि लग्नाशी संबंधित वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे तिच्यासाठी नटण्या-मुरडण्याची संधी असते. लग्नाच्या समारंभांमध्ये भरजरी किंवा डिझायनर कपडे आणि मेकअपच्या बरोबरीनेच दागिने हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याबाबत योग्य माहिती असणेही गरजेचे आहे.

कॉकटेल पार्टी, संगीत, हळद, मेहेंदी असे अनेक समारंभ हल्ली भारतात केले जातात. पण लग्नाच्या दिवसाचे वेगळेच महत्त्व असते. लग्नातील कपड्यांना साजेसे पारंपरिक दागिने हे सोन्याचेच असतात. महाराष्ट्रीय लग्नांमध्ये ठुशी, कोल्हापुरी साज, चपलाहार, चिंचपेटी, तोडे, गोठ, नथ इ. दागिने वापरले जातात. हल्ली यातले नवनवीन प्रकार बाजारात बघायला मिळत असून यात मोत्याची ठुशी, सोन्याची चिंचपेटी याचा समावेश होतो. तसेच, म्हाळसा झुमके, सोन्याचे कान, काशी नथ असे जुन्या दागिन्यांचे नवीन अवतार सध्या बाजारात उपलब्ध असून त्याचीच अधिक चलती आहे.

आता इमिटेशन ज्वेलरी वापरण्याचाही ट्रेण्ड आहे. त्यामुळे कपड्यांवर शोभून दिसतील अशी इमिटेशन ज्वेलरी वापरली जाते. काही वेळा ब्रायडल ज्वेलरी सेट भाड्यानेसुद्धा मिळतो. त्यामध्ये गळ्यालगतचं एक गळ्यातलं, मध्यम आकाराचं एक गळ्यातलं, लांब गळ्यातलं, कानातले, मांग टीका, चेन, नोजरिंग इ. प्रकार सेटमध्ये मिळतात.

लग्नात दागिने वापरताना पुढील टिप्स नक्की लक्षात ठेवा

१. सोन्याव्यतिरिक्त इतर वेगळे दागिने नक्की ट्राय करून बघा.

२. कधी कधी अति दागिने घातल्याने थकवा येऊ शकतो, त्यामुळे प्रमाणातच दागिने असू द्यावेत.

३. तुम्हाला कितपत जड दागिने सहन होतात त्याचा अंदाज घेऊनच दागिन्यांची निवड करा. त्यामुळे दागिन्यांचे वजनही जास्त होणार नाही आणि प्रत्येक दागिना उठून दिसेल.

४. दागिने घालताना त्याची लेयरिंग खूप महत्त्वाची असते. गळ्यालगतच्या दागिन्यापासून ते लांबलचक दागिना असा क्रम असावा. सुरुवातीला ठुशी, त्याहून मोठा गळ्यातला दागिना आणि नंतर शाही हार असा क्रम ठेवा. मंगळसूत्रसुद्धा याच लेयरिंगमध्ये समाविष्ट करा.

Input your search keywords and press Enter.