Now Reading:
प्रेमभंगाच्या दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग
प्रेमभंगाच्या दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग

प्रेम आणि प्रेमभंग प्रत्येकाच्या नशिबी कधी ना कधी येतातच. प्रेमभंगानंतर ओढवणारे दुःख मानवी मनाला पार भोकसून टाकणारे असते. या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रथम त्या स्थितीस समजून घेणे आवश्यक असते.

शास्त्रज्ञांच्या मते प्रेम हे व्यसन आहे. मानवी मेंदूचा अभ्यास केला असता प्रेमभंग आणि परिणामी होणारे दुःख ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने मात करता येते असे जगभरातील तज्ज्ञांचे मत आहे. तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा प्रेमभंग झाला असल्यास खालील प्रकारे त्यावर मात करण्यात मदत होईल.

स्वतःची काळजी घ्या

प्रेमभंग म्हणजेच ब्रेकअपनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट करावी ती म्हणजे स्वतःची काळजी घेणे. हृदयभंगानंतर सहसा आपण फार उपद्रवी होऊन जातो. खाण्याकडे दुर्लक्ष, रात्रभर जागरण यासारख्या चुका प्रत्येक तरुण-तरुणी करतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर भर देणे गरजेचे आहे. या काळात स्वतःलाच स्वतःचा बेस्ट फ्रेन्ड व्हावे लागते. ब्रेकअपनंतर वाटणारी अस्वस्थता, राग, दुःख आणि चिडचिड सर्व काही स्वाभाविक आहे. एखाद्या भावनिक धक्क्यानंतर असे वाटणे साहजिकच आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

त्याचसोबत स्वतःला थोडा वेळ देणेही तितकेच गरजेचे आहे. सर्व काही एका रात्रीत निस्तरणार नाही. तुमच्या मनातील घुसमटीचा निचरा होण्यास मार्ग करुन द्या. रडा, मित्राकडे किंवा डायरीमध्ये आपल्या भावना व्यक्त करा. पण मन मोकळे करणे आवश्यक आहे.

सोबत महत्त्वाची

मानवी स्वभावाचा गुणधर्मच आहे की, त्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथीदाराची गरज असते. विज्ञान सांगते की नाते तुटल्यावर प्रचंड दुःख होते. यामुळे या दुःखातून वर येण्याकरीता कोणाच्या तरी सोबतीची गरज असते. मग ही सोबत नवीन साथीदार, मित्र किंवा मानसोपचारतज्ज्ञामार्फत मिळवता येते. प्रेमभंगाचे दुःख कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमच्या मानसिकतेशी मिळतेजुळते घेणाऱ्यांची सोबत ठेवणे हा एक उत्तम उपाय आहे.

वेळ द्या

वेळ हे प्रत्येक समस्येवरचे औषध आहे. तुम्ही स्वतःला वेळ दिलात तर तुमच्या शरीराला या मानसिक / भावनिक धक्क्यातून सावरण्यासही सोपे जाते. सुरुवातीस ज्या गोष्टींनी अवघडल्यासारखे वाटायचे किंवा आपल्या साथीदाराची आठवण करुन द्यायच्या त्या गोष्टी कालांतराने विसरल्या जातात. त्याचे मनावर ओझे होत नाही. जशी प्रेमाची काही निश्चित व्याख्या नाही, तसेच प्रेमभंगावर निश्चित औषध नाही. फक्त स्वतःला ज्या गोष्टींत आनंद वाटतो त्या गोष्टी करा.

तसेच जर तुमच्यासाठी हे उपाय कामी येत नसतील तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.