Now Reading:
जाणून घ्या, होलिका दहनाचा शुभ मुहूर्त
जाणून घ्या, होलिका दहनाचा शुभ मुहूर्त

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक देशानुसार हा सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो.

उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र राज्यांत शिमगा, होळी अन् होलिका दहन तर दक्षिणेत कामदहन म्हणून संबोधले जाते. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव असेही म्हणतात.

होळी का साजरी करतात

राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता.  त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने बहिण होलिकाची मदत घेतली.

ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. त्यामुळे हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावे हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे.

होलिका दहन करण्यापूर्वी परंपरेनुसार पूजा केली जाते. त्यानंतर शुभ मुहूर्तावर होलिका दहन करण्यात येते. यंदा २०१८ मधील होलिका दहनचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

होलिका दहनाचा मुहूर्त

तारीख – १ मार्च २०१८

मुहूर्त – सायंकाळी ६.१६ पासून ८.४७ पर्यंत

होळीचा मुहूर्त

तारीख – २ मार्च २०१८

मुहूर्त – सकाळी ६.२१ पासून सुरु

Input your search keywords and press Enter.