Now Reading:
घरीच तयार करा गरम मसाला
घरीच तयार करा गरम मसाला

विशिष्ट पदार्थांसाठी विशिष्ट मसाले, हे आजचे समीकरण घराघरातून काटेकोरपणे पाळले जाते. व्यक्ती तितक्या प्रकृती, या उक्तीप्रमाणे घरांघरांप्रमाणे मसाल्यातही वैविध्य आढळते. प्रत्येकाची स्वतंत्र पाकशैली असते. स्वतःची अशी खासियत असते. त्यातून गरम मसाला तर आपल्या मराठी लोकांमध्ये फारच महत्त्वाचा असतो. सुके मसाले घरी तयार करून बाटलीत भरून ठेवता येतात.

तीन-चार महिने हे मसाले चांगले राहतात. सुट्टीच्या दिवशी मसाला तयार करून ठेवला तर रोजच्या दगदगीतदेखील जेवणाला चविष्ट स्वाद मिळवून देण्यास उपयोगी पडतो. तुमच्या स्वयंपाकाला स्वाद आणणाऱ्या गरम मसाल्याची कृती जाणून घेऊया.

साहित्य:

१०० ग्राम धणे , ५ ग्राम जिरं, २० ग्राम काळी मिरी , २० ग्राम मसाला वेलची, १० ग्राम दगडफूल, १० ग्राम लवंग, ५ ग्राम तमालपत्र, १० ग्राम बडीशेप, ५ ग्राम जवित्री, ५ ग्राम दालचिनी, १० ग्राम सुंठ, १ जायफळ

कृती: 

१. एका गरम पॅनमध्ये धणे मध्यम आचेवर ८ ते १० मिनिटं परतून घ्या. त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढा.

२. जिरं आणि बडीशेप एकत्रित करून ३-४ मिनिटे भाजा.

३. त्यानंतर काळी मिरी, मसाला वेलची, लवंग, दगडफूल, जवित्री, दालचिनी आणि तमाल पत्राचे तुकडे करून ७-८ मिनिटं पॅनवर परतून घ्या.

४. हा मसाला जरा वेळ थंड हाऊ द्या.

५. मिक्सरच्या एका भांड्यात भाजलेले धणे, जिरं आणि बडीशेप बारीक वाटा. वाटलेला मसाला चाळा.

६. उरलेला गाळ आणि बाकी भाजलेले मसाले मिक्सरमध्ये घालून वाटा. जो गाळ उरेल त्याची बारीक पावडर करावी.

७. संपूर्ण मसाला एकत्रित करून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटा.

तयार आहे घरगुती गरम मसाला! हा मसाला तुम्ही नेहमीच्या जेवणात, तंदुरी चिकनमध्ये किंवा बियार्णीमध्ये वापरला तर ती खूप चविष्ट होते.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.