Now Reading:
गरमागरम चहा आणि मोफत वायफाय पुरविणारी महिला रिक्षाचालक!
गरमागरम चहा आणि मोफत वायफाय पुरविणारी महिला रिक्षाचालक!

महिलांना पुरुष चालक असलेल्या रिक्षातून प्रवास करताना कुचंबणा सहन करावी लागायची. ठाणे शहरात पुरुष रिक्षाचालकांकडून महिलांना असभ्य वागणूक दिल्या गेल्याच्या अनेक घटना काही वर्षांपूर्वी ऐकायला मिळत होत्या. तसेच, अपराधाच्या घटनाही घडू लागल्या होत्या.

हे वास्तव लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून महिला रिक्षाचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी अबोली रिक्षा योजना आखण्यात आली आणि गुलाबी या विशिष्ट रंगाच्या रिक्षाला ‘अबोली’ असे नाव देण्यात आले. मात्र या क्षेत्रात येण्यासाठी अनेक महिला उत्सुक असल्या तरी त्यांच्यासमोर आदर्श नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या परिस्थितीत ठाण्यातील अनामिका भालेराव यांनी महिला सुरक्षेसाठी रिक्षाचालक म्हणून कार्यरत होण्याचा निर्णय घेतला.

 

घरची परिस्थिती बेताची म्हणून अनामिका रिक्षा व्यवसायात आल्या.

ज्या वेळी या व्यवसायात केवळ पुरुषांचे वर्चस्व होते त्या वेळी, त्या या व्यवसायात रुजू होणे हे त्यांच्यासाठी आव्हान होते. मात्र सहकार्य आणि आधार या दोन गोष्टींच्या बळावर त्या रिक्षाचालक झाल्या आणि आज या व्यवसायात अनेक महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक रिक्षाचालक तयार होऊन त्यांचा स्वतंत्र व्यवसाय करत आहेत.

 

अनामिका यांची ही अबोली रिक्षा काही साधारण नाही. त्यांच्या रिक्षामध्ये प्रवाशांसाठी वृत्तपत्र, वायफाय, चाय, कॉफी आणि पाण्याच्या बाटलीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये प्रथमोपचाराचीही मोफत सुविधा आहे. अनामिका यांचे पतीसुद्धा रिक्षाचालक असून, त्यांच्याकडूनच त्यांनी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. यात त्यांना त्यांच्या कुटुंबाचा मोठा पाठिंबा मिळाला.

आजच्या घडीला स्त्रिया विमानातून गगनभरारी घेत असताना रिक्षा चालवण्यात काय अडथळा, असे म्हणत कुटुंबियांनी त्यांना प्रोत्साहित केले. आजच्या घडीला अनामिका रिक्षा चालवून त्यांच्या पतीला घरखर्चातही मदत करत आहेत.

Cover Image Source: DNA

Input your search keywords and press Enter.