Now Reading:
मुंबईच्या बस आगारातील महिला कंडक्टर सांगतेय तिच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी!
मुंबईच्या बस आगारातील महिला कंडक्टर सांगतेय तिच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी!

मुंबईतील भायखळा येथे आपल्या एकुलत्या एक मुलीसोबत राहणाऱ्या सुजाता भुजबळ. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्या ब्युटीशियन म्हणून काम करत होत्या. सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच भुजबळ कुटुंबाला एक दुर्दैवी धक्का बसला. त्यांच्या पतिचं अकस्मात निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. आजुबाजूला सर्व काही विखुरलेलं असताना सुजाता मात्र आपल्या परिवारासाठी निर्धाराने उभ्या राहिल्या. आणि लागलीच आपल्या दिवंगत पतिच्या जागी बेस्टमध्ये बसवाहक (कंडक्टर) म्हणून रुजू झाल्या.

गेली ५ वर्षे त्या बेस्टच्या ताडदेव बस आगारामध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा प्रवास बऱ्याच जणींना प्रेरणादायी आहे. त्यामुळेच महिला दिनाच्या निमित्ताने नेटपरने सुजाताशी मनमोकळ्या गप्पा साधल्या.

तुमच्या क्षेत्रातील पुरुषी वर्चस्वावर तुमचं काय मत आहे?

पुरुषी वर्चस्व तर असणारच! जोवर महिला स्वतःहून आत्मविश्वासाने घराबाहेर पडत नाहीत तोवर हे चित्र बदलणे शक्य नाही. विशेषतः पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये तग धरुन ठेवणे नक्कीच कठीण आहे, पण अशक्य नाही. प्रत्येक परिस्थितीला आत्मविश्वासाने व सामर्थ्याने तोंड दिल्यास महिलांसाठी कोणतीच अडचण मोठी नाही. 

“तुम्हाला मागे खेचायला बरेच हात पुढे होतील पण तुमच्या मदतीसाठी क्वचितच कोणी धावून येईल.”

अशा धावून येणाऱ्या हातांपैकी प्रामाणिकपणे मदतीसाठी आलेले हात ओळखणे महाकठीण. हा पेच सोडवता आला तर अर्धीअधिक शर्यत तिथेच जिंकलो म्हणून समजा.

तुमचे सहकर्मचारी तुम्हाला मदत करतात का?

 

मी ताडदेव आगारमधील एकमेव महिला कंडक्टर आहे. मी आवर्जून सांगू इच्छिते की, आज मी इथे या ठिकाणी उभी आहे त्याचं सर्व श्रेय माझ्या सहकाऱ्यांनाच जातं. ते मला सर्वतोपरीने सहकार्य करतात. मी स्वतःला नशीबवान समजते की, मला असे मनमिळाऊ सहकीरी मिळाले. मला ते कुटुंबासारखेच आहेत. त्यांचं मार्गदर्शन लाभलं नसतं तर या नवीन जगात स्वतःला स्थिरस्थावर करणं कदाचित मला जमलंही नसतं. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी राहिन.

तुमच्याबद्दल वाचत असलेल्या महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?

मैत्रिणींनो, क्षेत्र कोणतंही असो, हार मानायची नाही. ही एवढी गोष्ट मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यात बिंबवा. स्वतःला कोणापेक्षा कमी लेखू नका. तुम्ही सर्व काही साध्य करू शकता, फक्त आपल्या ध्येयाच्या दिशेने निष्ठेने काम करा.

सुजाताच्या निर्धाराला नेटवर सलाम!

Cover Image: Netpar 

Input your search keywords and press Enter.