Now Reading:
रेसिपी: ढाबा स्टाइल पनीर मसाला करा घरच्या घरी
रेसिपी: ढाबा स्टाइल पनीर मसाला करा घरच्या घरी

पनीर हा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही खवय्यांचा आवडता पदार्थ आहे. लहान मुलंही नाक न मुरडता पनीर खातात. त्यामुळे अनेक आया आपल्या मुलांसाठी पनीरचे विविध पदार्थ करण्याचा प्रयत्न करतात. तर आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाइल पनीर मसालाची रेसिपी.

साहित्य

२५० ग्रॅम पनीर, तेल, तूप, लवंग ४-५, दालचिनी, वेलची ४-५, जिरे, गरम मसाला, काश्मिरी मसाला किंवा लाल मसाला, धना-जिरा पावडर, कसुरी मेथी, १ चमचा बेसन, कोथिंबीर, मीठ, काळी मिरी पावडर, एकदम बारीक चिरलेले ३ कांदे, तीन टोमॅटोची प्युरी (यासाठी टोमॅटो उखडून त्याची साल काढून ते मिक्सरला लावा).

कृती

प्रथम पनीरचे तुकडे तुम्हाला आवडतील त्या आकारात कापून घ्या. त्यावर एक टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून काश्मिरी आणि गरम मसाला, हळद टाकून ते मॅरिनेट करा. चमचाने पनीर ढवळू नका कारण ते कुस्करु शकतात. अर्धा तास पनीरचे तुकडे तसेच ठेवा. पनीरला मसाला व्यवस्थित लागेपर्यंत ग्रेवीची तयारी करा.

एका पॅनमध्ये तीन चमचे तेल आणि एक चमचा तूप टाका. मध्यम आचेवरच तेलात जिरे, वेलची, लवंग आणि बारीक केलेली दालचिनी परतून घ्या.

नंतर तेलात कांद्याची प्युरी किंवा एकदम बारीक केलेला कांदा परता. कांदा अर्धा भाजल्यानंतर त्यात एक टीस्पून गरम मसाला, लाल मसाला, कसुरी मेथी, धना-जिरा पावडर, काळी मिरी पावडर आणि बेसन टाका.

बेसनमुळे ग्रेवीला घट्टपणा येऊन त्याला पाणी सुटणार नाही.

सर्व मिश्रण कांदा चांगला लाल होईपर्यंत मध्यम आचेवर ३-४ मिनिटे परतून त्यात टोमॅटो प्युरी टाका.

टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर ३-४ मिनिटांसाठी पॅनवर झाकण ठेवा.

ग्रेवी तयार होईपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये किंवा तव्यावर एक चमचा तूप टाका (तेलही चालेल). त्यात मॅरिनेट केलेले पनीर एक ते दीड मिनिटांसाठी परता. यामुळे पनीर एकदम मऊ होईल. पनीरचे तुकडे काळे होणार नाहीत याची दक्षता घ्या.

तोपर्यंत तुमची ग्रेवीही तयार होईल आणि त्याला सुंदर खमंग वास येईल. ग्रेवीत एक कप पाणी टाकून व्यवस्थित ढवळा आणि त्यात पनीरचे तुकडे टाका.

पनीर मसालावर वरून बारीक कोथिंबीर शिवरून गार्निश करा.

Input your search keywords and press Enter.