Now Reading:
मुलाखतीच्या वेळेस स्वतःच ठरवा स्वतःचा पगार
मुलाखतीच्या वेळेस स्वतःच ठरवा स्वतःचा पगार

नवीन नोकरी स्वीकारताना पगाराबाबत कशी बोलणी करायची हे बऱ्याच लोकांना समजत नाही. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या मुलांना तर याबाबत काहीच माहिती नसते. त्यामुळे या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गुणवत्तेचा वापर करुन त्यांना कमी पगार दिला जातो. म्हणूनच मुलाखतीच्या वेळीच पगाराबाबत आत्मविश्वासाने बोलणी करता आली पाहिजे. तुमचा पगार ठरवताना पुढील मुद्दे लक्षात घेतले पाहिजे-

पूर्वतयारी करा

पगाराची बोलणी करताना आधी स्वतः पूर्वतयारी करा. पगारासंबंधी आत्मविश्वासाने चर्चा करण्यासाठी त्या कंपनीची सखोल माहिती असणे महत्त्वाचे आहे. अर्ज केलेल्या कामाच्या स्वरुपाबद्दलही पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या वेळी मुलाखत घेणाऱ्याला तुम्ही या कामासाठी कसे योग्य आहात हे पटवून देता आले पाहिजे. यामुळे पगाराबाबत बोलणी करण्यास सोपे जाते.

आजूबाजूच्या परिस्थितीची दखल घ्या

स्वतःची गुणवत्ता आणि नोकरीच्या विश्वात आपल्या पात्रतेबद्दल आत्मसमिक्षण करावे. त्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीची दखल घ्या. कोणती कंपनी चांगली आहे? तिचे कर्मचाऱ्यांविषयी धोरण कसे आहे? ज्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे त्या क्षेत्रात तिचे स्थान काय आहे? या सर्व गोष्टींचा आढावा घ्या. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन त्यानुसार मुलाखतीच्यावेळेस पगाराबाबत चर्चा करता येते.

प्रथम कंपनीची बाजू ऐकून घ्या

उतावीळपणे शब्द टाकण्यापूर्वी प्रथम समोरच्या कंपनीची बाजू ऐकून घ्या. कंपनी किती पैसे ऑफर करत आहे, हे आधी ऐकून घ्या. मग त्यावरच तुमचे मत मांडा. तसेच हे ठरवताना पगारवाढी बाबतही चर्चा करा. कामाचे स्वरुप, वेळ, जबाबदारी इत्यादी गोष्टींचे भान ठेवूनच बोलणी करा.

इतर फायदे

पगाराबरोबरच इतर कोणत्या सवलती मिळत आहेत याची नोंद घ्या. वर्षभरात किती रजा आहेत? भविष्य निधीची तरतूद आहे का? प्रवासभत्ता दिला जातोय का? या गोष्टींकडे लक्ष द्या. तसेच जादा वेळ काम केल्यास त्याचे पैसे मिळतात का आणि किती मिळतात याची विचारपूस करा.

नोकरी सोडण्याची तयारी ठेवा

सध्याच्या काळात नोकरी की पगार यापैकी तुम्हाला नक्की काय गरजेचे आहे, हे ठरवा. नोकरीची गरज असल्यास पगाराबाबत सुरुवातीला थोडी तडजोड करावी लागेल. पण जर दुसऱ्या कंपनीमधून तुम्हाला चांगला पगार मिळण्याची शक्यता असल्यास नोकरीवर पाणी सोडण्याची तयारी ठेवा. नोकरी बदला अथवा याच कंपनीत पगारवाढीसाठी प्रयत्न करा.

अशाप्रकारे तुम्ही तुमचा पगार ठरवून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करु शकता.

Cover Image Source: 3 Idiots movie still

Input your search keywords and press Enter.