Now Reading:
ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक? नकली वस्तूवर सरकार परत मिळवून देणार पैसे!
ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक? नकली वस्तूवर सरकार परत मिळवून देणार पैसे!

सोशल मीडियावर कित्येकदा इ-विक्रेत्यांकडून झालेल्या फसवणूकीच्या पोस्ट्स फिरत असतात. कधी फोन मागवला तर दगडच मिळाला काय तर, सिल्कच्या साडीच्या जागी कॉटनची साडी आली काय. पण ही अशा प्रकारची फसवणूक प्रथमदर्शनी निदर्शनास तरी येते. पण बाजारात नकली वस्तूंचा वावर अधिकच वाढलाय आणि सामान्य ग्राहकाला याचं निदान करण्याचंही काही ज्ञान नसतं. याच समस्येचा काटा काढण्याचा निर्णय घेतलाय औद्योगिक धोरण आणि जाहिरात विभागाने (Department of Industrial Policy & Promotion, DIPP)

ग्राहकांसाठी कॅशबॅक प्रणाली

DIPP अशा प्रस्तावावर काम करतंय ज्याच्या अनुसार ग्राहकांना बनावट वस्तू मिळाल्यास पैसे परत (कॅश-बॅक) मिळतील. हा प्रस्ताव अजूनही आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पण ग्राहक व्यवहार मंत्रालय व इ-कॉमर्स वेबसाइट्समध्ये चर्चेस सुरुवात झालीय.

बनावटी मालाची जागतिक आपत्ती

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार बनावटी माल ही काही लहानसहान तक्रार नसून त्याचं एका जागतिक समस्येत रुपांतरण होतंय. ज्याचे पडसाद आर्थिक व सामाजिक वर्तुळात दिसून येतील ज्यामुळे देशाचं कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

या कार्यप्रणालीचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा, तुम्ही फोन विकत घेतला ऑनलाइन व काही महिन्यांनी दुरुस्तीसाठी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरकडे गेल्यावर कळलं की हा फोन बनावटी आहे. तर, अशा परिस्थितीत तुम्हाला या सुविधेअंतर्गत पैसे परत मिळतील. सध्या इ-विक्रेत्यांच्या वस्तू बदलून देण्याच्या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त ३० दिवसांचा अवधी असतो. पण या योजनेत वस्तू बदलून घेण्याचा अवधी उलटून गेल्यावरही तुम्हाला पैसे परत मिळतील.

कशी काम करणार ही सुविधा?

अजूनही भारत संपूर्णतः कॅशलेस व्यवहार करत नसल्याने ही योजना सध्यातरी कॅश-बॅक स्वरुपातच असेल. त्यामुळे अजून तरी सुविधेत कॅनडा व हाँगकाँगसारखा यात बँकांचा समावेश नसेल.

यासाठी एक तक्रार नोंदवण्यासाठी संकेतस्थळ नेमलं जाईल. जिथे तक्रार नोंदवल्यावर इ-विक्रीच्या संकेतस्थळाकडे ही तक्रार पाठवली जाईल त्यांनी जर तक्रार वैध घोषित केली तर लगेचच तुमचे पैसे परत करण्यात येतील.

Input your search keywords and press Enter.