Now Reading:
धावण्याने हृदयाचे विकार राहतात चार हात लांब, पण नेमकं किती वेळ धावायला हवे? वाचा
धावण्याने हृदयाचे विकार राहतात चार हात लांब, पण नेमकं किती वेळ धावायला हवे? वाचा

“लाइफ इज अ रेस, दौडोगे नही तो कोई तुम्हे कुचल के आगे निकल जायेगा”

 

‘थ्री इडियट्स’ मधला हा डायलॉग तर तुम्हाला माहितच आहे. आयुष्य जरी शर्यत नसली तरी आयुष्यात धावणं फार महत्त्वाचं आहे. दिवसातून किमान ५ मिनिटे धावल्याने तुम्हाला हृदयाचे आजार स्पर्श सुद्धा करणार नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, तुम्ही कुठेही धावू शकता, त्याला जागेचं बंधन नाही. धावायला पैसे मोजावे लागत नाहीत म्हणजेच तुम्हाला मोफत तुमच्या निरोगी भविष्यासाठी तरतूद करता येते.

पण बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की, मग किती वेळ धावावं? जास्त धावलं तर जास्त फायदा होईल का? यासाठीच एक विस्तृत संशोधनातून निष्कर्ष काढण्यात आले, पाहूया-

 

एक विस्तृत संशोधन-

संशोधकांनी हजारो माणसांच्या आरोग्याची तपासणी करून लोकांना त्यांच्या सवयी, आहार, धावण्याचे प्रमाण याबद्दल प्रश्न विचारले. त्यातून एकूण ५५,१३७ पुरुष व स्त्रियांचे रिपोर्ट चाळण्यात आले. त्यात १८ ते १०० वयोगटातील लोकांचा समावेश होता, त्यापैकी २४ टक्के लोक दैनंदिनरित्या किमान ५ मिनिटे धावणारे होते. नंतरच्या १५ वर्षात त्यापैकी ३५०० लोक हृदयविकाराने दगावले. त्यापैकी धावणाऱ्यांचे प्रमाण अगदी नगण्य होते. या अभ्यासातून असा निकष लावण्यात आला की धावणाऱ्या व्यक्तीला हृदय विकार होण्याची शक्यता ४५टक्क्यांनी कमी होती.

 

फक्त नित्याने धावा-

संशोधनातून हे आढळलं की, तुम्ही किती जास्त धावताय याने काही फरक पडत नाही. जास्त वेळ धावणारे आणि किमान ५ मिनिट धावणारे यांच्या आरोग्यात फारसा फरक आढळून नाही आला. पण अगदीच ना धावणाऱ्यांच्या आरोग्यात बराच फरक पडला. याव्यतिरिक्त ५ मिनिटे धावण्याने तुमचे मानसिक आरोग्य आणि वजन ही आटोक्यात राहते.

Cover Image Source: Pixabay

Input your search keywords and press Enter.