Now Reading:
अनाथांना आरक्षण मिळवून देणारी पुण्यातील धाडसी मुलगी
अनाथांना आरक्षण मिळवून देणारी पुण्यातील धाडसी मुलगी

देशातील अनाथ आश्रमांमध्ये लाखोंनी अनाथांचे संगोपन होत आहे. त्यांचे बरेच प्रश्न आहेत जे सर्वसामान्य विकास कामांच्या संवादाचा भागही नाहीत. त्यांचे प्रश्न व समस्या कोणत्याही प्राइम टाइम चर्चासत्राचा भाग नाही. असं असताना एका अनाथ मुलीने आपल्या ठाम निर्धाराने आपल्यासारख्या अनाथांसाठी रोजगारामध्ये १ टक्का आरक्षण मिळवून दिले. कोण आहे ही मुलगी? वाचा-

एमपीएससीत अपयश

२३ वर्षीय अमृता प्रणय करवंदेचं बालपण गोव्यातील मातृछाया अनाथाश्रमात गेलं. सध्या ती महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रात एम. ए. करतेय. त्यासोबतच ती एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करतेय. २०१६ मध्ये एमपीएससीच्या ओपन श्रेणीत ती काही गुणांनी अपयशी ठरली. यामागचे कारण हे की तिला आपली कौटुंबिक माहिती फॉर्मवर भरता आली नाही. तसेच तिच्याकडे नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट (NCL) नव्हते.

ती थोडी पेचात पडली की, आता काय? कारण कितीही परीक्षा दिल्या तरी तिचं नॉन क्रिमी लेयर काय बनणार नाही. कारण, तिला तिचे पालक कोण ते ठाऊक नाही. पालक नसल्याने मिळकत नाही. त्यामुळे नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट नाही, कारण त्यासाठी जात माहित असणे आवश्यक असते तर ती ही तिला ठाऊक नाही.

समाज कल्याण पण हतबल

तिने यावर तोडगा काढायचे ठरवले. तिने प्रथम कलेक्टरना भेट दिली तर त्यांचं उत्तर आलं की, तिची फाइल समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवण्यात आलीय. मात्र समाज कल्याण कार्यालयाकडून उत्तर आलं की त्यांच्याकडे अशा परिस्थितीत काहीच धोरण नाही. आणखी एक अडथळा. इथून पूढे मार्ग तो काय?

तिच्या लक्षात आलं की, आता माघार घेतली तर ही हार आजन्म तिची पाठ नाही सोडणार. तिने बरीच विचारपूस करून मुख्यमंत्र्यांना गाठायचं ठरवलं. त्यांना भेटून आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली.

सरकारने दिला सादेला प्रतिसाद

तिची ही समस्या जाणल्यावर महाराष्ट्र सरकारने अनाथांसाठी राज्य पातळीवर रोजगारासाठी १ टक्का आरक्षण जाहिर केले. हा नक्कीच एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि याच्या मुळाशी अमृताचा मोलाचा वाटा आहे. अनाथांसाठीचे हे आरक्षण जनरल श्रेणीतच मोडले जाईल. ते अशा अनाथांना लागू होईल ज्यांना आपली जात ठाऊक नाही.

आई वडिलांच्या पार्श्वभूमीबद्दल अंधारात

अमृताला ती प्रकाशझोतात येईपर्यंत ठाऊकही नव्हतं की, तिची आई कॅन्सरने दगावली व वडील मद्याच्या आहारी गेल्याने त्यांना त्यांच्या मुलांचे संगोपन करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी तिला व तिच्या भावाला अनाथालयात आणून सोडले. पण तिचा त्यांच्यावर राग नाही, कारण तिच्या मते त्यांनी खूप योग्य निर्णय घेतला व त्यांना रस्त्यावर न सोडता या संस्थेत आणून सोडलं. जिथे तिची इतकी उत्तम सोय झाली.

हजारोंसाठी प्रेरणास्थान

ती आता गोवा, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यातील शाळा, अनाथालये व संस्थांमध्ये व्याख्यानांमार्फत प्रेरणा देण्याचे काम करते. एमपीसससी परीक्षा पास करून अधिकाही व्हायचं आणि ग्रामीण भागाचा विकास घडवून आणायचा असं तिचं स्वप्न आहे. ती सध्या नॅशनल सोशल सर्व्हिसेसच्या ग्रामीण भागातील विकास कामांची ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर आहे.

ती पुन्हा एमपीएससीची तयारी करतेय त्यासोबतच ती समाजातील ‘अनाथ’ ही संकल्पना पुसून काढण्यासाठी प्रस्ताव तयार करतेय. अमृताला वाटतं की त्यांनाही समाजात बरोबरीचे स्थान मिळेल.

News and Image Source: Hindustan Times

Input your search keywords and press Enter.