Now Reading:
ताठ बसून कॅलरी घटवा; जाणून घ्या सरळ बसण्याचे ५ मानसिक व शारीरिक फायदे!
ताठ बसून कॅलरी घटवा; जाणून घ्या सरळ बसण्याचे ५ मानसिक व शारीरिक फायदे!

हा लेख वाचताना तुमच्यापैकी कितीजण ताठ बसले किंवा ताठ उभे आहेत? आता ताठ बसलात ना? हे असंच असतं. फोन-कॉम्प्युटर वापरताना, टिव्ही बघताना, जेवताना आपलं पाठीच्या कण्याकडे नेहमी दुर्लक्ष होतं. मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी तुमच्या दैनंदिन कामात पाठीच्या कण्याचा पवित्रा अत्यंत महत्त्वाचा आहे. कसे? जाणून घ्या पुढे-

श्वसनक्रिया सुधारते व उत्साही वाटते

ताठ बसल्याने व उभं राहिल्याने श्वसननलिकेचा पडदा अधिक प्रभावी काम करतो. ज्याने श्वसनात अडथळा निर्माण होत नाही. तसेच पोक काढून बसल्याने बरगड्यांच्या प्रसरणास अडथळा निर्माण होतो. परिणामी तुमच्या फुप्फुसांची क्षमता कमी होते. ज्याचा प्रभाव श्वसनक्रियेवर होतो.

सुसंगत श्वसनक्रियेमुळे शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते.

अधिकाधिक कॅलरी बर्न करण्यास (कॅलरी घटवणे) मदत

आधी सांगितल्याप्रमाणे योग्य पवित्र्याने शरिरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. यामुळे तुम्हाला व्यायाम करणे सुलभ होते. तसेच ताठ उभं राहिल्यावर तुमचे सांधे योग्य स्थितीत असतात. फक्त योग्य पद्धतीने उभं राहिल्याने पण कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

डोकेदुखीचं प्रमाण कमी

तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या उठण्या बसण्याच्या पवित्र्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आखडलेली मान, जबडा किंवा पाठ यामुळे सततची डोकेदुखी होऊ शकते. जेव्हा स्नायू अधिकाधिक आकुंचन पावतात तेव्हा शरिराच्या स्नायूंमध्ये तणावाचे बिंदू निर्माण होतात. परिणामी डोकेदुखी होऊ लागते.

सांधे मजबूत राहतात

पाठीच्या कण्याचा चुकीचा पवित्रा सांध्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो. तसेच त्याने मान, खांदा व आसपासच्या स्नायूंवरही ताण येतो. पोक काढून उभं राहिल्याने पाठीच्या कण्यावर ४-५ किलोने जास्त दबाव येतो. अशाने पाठदुखी, कमरेचा त्रास उद्भवू शकतो. योग्य पवित्रा स्नायूंचे संतुलन राखण्यास मदत करतो तसेच सांध्यांवरचा दबाव कमी होतो.

मानसिक स्वास्थ्य सुधारते

ऑकलंड विद्यापीठातील संशोधनानुसार, ताठ बसल्याने मनावरील तणाव कमी होतो. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी लोकांना दोन गटात विभागले. पहिला गट ताठ बसणाऱ्यांचा होता, तर दुसऱ्या गटातील माणसे पोक काढून बसणारी होती. प्रयोगाच्या शेवटी असे आढळले की, ताठ बसणारा गट जास्त उत्साही दिसत होता. तर पोक काढून बसलेल्या लोकांचा गट पेंगताना दिसत होता.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.