Now Reading:
जळगावमधील एक जिद्दीने पेटलेला तरुण झाला १०० कचरा वेचणाऱ्यांच्या शिक्षणाचा आधारस्तंभ
जळगावमधील एक जिद्दीने पेटलेला तरुण झाला १०० कचरा वेचणाऱ्यांच्या शिक्षणाचा आधारस्तंभ

जळगावचे अद्वैत दंडवते २०१० मध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करत होते. जळगाव जिल्ह्यातील ४०० मुलांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करताना त्यांना जिल्ह्यातील मुलांच्या वेगवेगळ्या समस्यांची माहिती मिळाली. त्यानंतर या सर्व गोष्टींचे आकलन करून त्यांनी २०१३ मध्ये वर्धिष्णू या समाजसेवी संघटनेची स्थापना केली. या सुंदर कार्यात पत्नी प्रणाली यांची त्यांना पूर्ण साथ मिळाली.

जिल्ह्यातील प्रत्येकाला सुरु केलेल्या कार्याचे पूर्णरित्या आकलन होण्यासाठी तीन वेगवेगळे गट पाडण्यात आले. पहिला पंधरा वर्षांखालील लहान मुलांचा, दुसरा पंधरा ते तीस वयोगटातील तरुणांचा आणि शेवटचा तीस वर्षांवरील मोठ्यांचा गट होता.

लहान वयोगटातील मुले ही खूप संस्कारक्षम असतात. त्याचबरोबर अशी कचरा उचलणारी, हॉटेलात काम करणारी मुले कमी वेळात व्यसनाधीन होत असल्याचे दिसून येते. या निराधार मुलांना शिकवण्याची जबाबदारी अद्वैत आणि प्रणालीने घेतली. दंडवते दाम्पत्यासमवेत सहा शिक्षक, डॉक्टर्स आणि विशेष सल्लागार अशी वर्धिष्णूची पूर्ण टीम मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि त्यांचा सर्वांगीण विकास याकडे विशेष लक्ष देत आहे. त्यांच्या संघटनेअंतर्गत असलेल्या आनंदघर या संस्थेच्या मदतीतून जवळपास १०० निराधार मुलांचा दाखला आसपासच्या सरकारी शाळांमध्ये करण्यात आला आहे. चार वर्षांमध्येच वर्धिष्णू संघटनेने केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. जळगावच्या या सुपुत्राची ही मेहनत बघून साऱ्या मराठी तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल, ही इच्छा. जेणेकरून राज्यातील एक ही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.