Now Reading:
चहावाल्याच्या मुलीला मिळाली ३.७ कोटीची स्कॉलरशिप
चहावाल्याच्या मुलीला मिळाली ३.७ कोटीची स्कॉलरशिप

एका चहा विक्रेत्याची आणि घराण्यात शिक्षण घेणारी पहिली मुलगी असलेल्या सुदिक्षा भाटीने बारावीत अथक मेहनतीने परीक्षेत ९८% गुण मिळवून जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला. बुलंदशहरमधील एका छोट्याशा गावात राहणारी सुदिक्षा ही शिक्षणाची संधी मिळणाऱ्या काही मोजक्या भाग्यवान मुलींपैकी एक आहे.

३.८ कोटी रुपयांची स्कॉलरशिप!

सुदिक्षाने ९८ टक्के तर मिळवलेच आहेत पण तिने अमेरिकेतील विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवल्याने ती सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. परिस्थितीवर मात करून उत्तम गुण मिळवणाऱ्या या हरहुन्नरी मुलीला तिने मिळवलेल्या गुणवत्तेच्या जोरावर अमेरिकेतील प्रसिद्ध अशा बॉबसन विद्यापीठात उद्योजकतेचे (Entrepreneurship) शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेकडून ३.८ कोटींची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या घटनेमुळे तिच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली असून, भविष्यातही खूप मेहनत करुन आपल्या आईवडिलांचे नाव उंचावण्याचा तिने निर्धार केला आहे.

अडथळे आणि समाजातील पूर्वाग्रह

सुदिक्षाच्या लहानपणी शिक्षणासाठी आर्थिक मुद्दा नेहमीच अडचणींचा विषय ठरत होता. शाळेची फी भरता न आल्यामुळे ९ वर्षांची असताना तिला खासगी शाळेतून काढून टाकण्यात आले होते. पण आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण पुरवण्याऱ्या शिव नादर संस्थेतील ‘विद्या ज्ञान’ शाळेत गेल्यापासून तिचे आयुष्यच बदलले.

तरीही समाजात असणाऱ्या पूर्वाग्रहाशी तिला लढा द्यावा लागला. मुलींना शिकवू नये, अशा सनातनी वातावरणात तिचे बालपण गेल्याने शाळेत शिकत असताना तिला आणि तिच्या पालकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. या काळात तिला तिच्या शिक्षकांकडून नेहमीच पाठिंबा मिळत राहिला.

सुदिक्षा म्हणते…

‘मला शिष्यवृत्ती मिळाल्याचे ऐकून माझी आई खूप खुश झाली आहे. देवाने तिची प्रार्थना ऐकली, असे तिला वाटतेय. आता अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याची आणि माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्याची संधी मला मिळेल. आर्थिक क्षमता नसतानाही मी हा पल्ला गाठू शकले याचा मला सर्वाधिक आनंद झालाय’ असे सुदिक्षाने आपले मनोगत व्यक्त केले आहे.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.